सांगली, 22 ऑगस्ट (आ.प्र.) : सांगली जिल्ह्यात सतत हाेत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि काेयना, वारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने कृष्णा आणि वारणा या नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीचे जिल्हाधिकारी अशाेक काकडे यांनी संभाव्य पूरस्थितीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा अलर्ट माेडवर ठेवली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीत सर्व संबंधित विभागांना सतर्क राहून वेळाेवेळी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. स्नेहल कनीचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, एनडीआरएफचे टीम कमांडर सुशांत शेट्टी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटाेळे, सर्व विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, महापालिकेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते.
जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील नदीकाठच्या परिसराचीही पाहणी केली.सर्व यंत्रणांनी सतर्क राहून पूरबाधित भागांमध्ये नियमित संपर्क ठेवावा आणि करावयाच्या उपाययाेजनेची पूर्वतयारी कायम ठेवावी. गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, बालकांना प्राधान्याने मदत करावी. अफवांवर विश्वास ठेवू नका, बचावकार्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी पाेलिसांना दिल्या. कृष्णा, वारणा या नद्यांचा इशारा व धाेका पातळीची नियमित तपासणी, नागरिकांच्या स्थलांतराचे नियाेजन, भाेजन, निवास व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वेळेत करावी. पशुधन आणि शेतजमिनींचे संरक्षण, पुरानंतर आराेग्य व साथराेगांबाबत औषधे ांची उपलब्ध करावीत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.