कर्तव्यकर्माच्या आड येणारे कामक्राेध किती भयंकर आहेत याचेच वर्णन याही ओवीत ज्ञानेश्वर गीतेच्या आधाराने करीत आहेत. ज्ञानेश्वरांनी ह्या वेळी एक संपूर्ण रूपक उपयाेजिले आहे. देहरूपी एक दुर्ग आहे. इंद्रियरूपी त्याचे गावकुसू आहे. कामक्राेधाने म्हणजे रजाेगुणाने उठाव केला की हा दुर्ग काेसळू लागताे.
प्रमाद, विचारशून्यता, अविवेक ह्यांना प्राधान्य मिळते. ह्या महाभंयकर कामक्राेधाची भूक एवढी असते की, सर्व विश्वाचा घासही त्यांना अपुरा पडताे. ह्या कामक्राेधांची एक भ्रांती नावाची बहीण आहे. विषयसुखाची वासना ही दासीप्रमाणे आहे. अहंकार व अविवेक ह्यांच्या सहाय्याने ते सर्व देहाला नाचवीत असतात. सर्व जगात दंभ व असत्य यांचा प्रभाव उमटताे. शांतीरूपी सखीला लुटून नेले जाते. कपटरूपी स्त्रीकडून साधूंचा समाज बाटविला जाताे. हे कामक्राेध विवेकाची प्रतिष्ठा नाहीशी करतात. संताेषरूपी वन उद्ध्वस्त करतात.
धैर्यरूपी किल्ला जमीनदाेस्त करून समाधानाचे राेपटे उपटून टाकतात. या कामक्राेधांनी ज्ञानाचे अंकुर खुडून काढले. सुख हा शब्दच पुसून टाकला आणि हृदयात भाैतिक दु:खरूपी अग्नी प्रज्वलित केला. या कामक्राेधांचा शाेध ब्रह्मादिकांनाही लागत नाही.
कधीकधी ते सत्तारूप ज्ञानाच्या पंगतीलाही बसतात आणि सर्वनाश करतात. ह्यांच्या भयानक कृत्याचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की, ते पाण्यावाचून बुडवितात, अग्नीवाचून जाळतात, शस्त्रावाचून मारतात, दाेरीवाचून बांधतात आणि ज्ञानी पुरुषाला प्रतिज्ञा घेऊन बंधनात टाकतात. हे चिखलावाचून गाडतात, जाळ्याशिवाय गुंतवितात. हे स्वत: चिवट असल्याकारणाने काेणाच्या स्वाधीन हाेत नाहीत. धूमाने अग्नी, धुळीने आरसा जसा झाकला जाताे, तसे आत्मज्ञान ह्यांच्यामुळे झाकले जाते. (क्रमशः)