पिंपरी, 21 ऑगस्ट (आ.प्र.) :
पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे लावले जाणारी होर्डिंग्ज, फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्समुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने 1 एप्रिल ते 31 जुलै या चार महिन्यांत 47 हजार 123 पोस्टर्स, बॅनसवर कारवाई झाली. त्यांच्याकडून चार लाख 68 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर एकावर गुन्हा दाखल केला आहे. शहरात अनधिकृतपणे फलक लावणाऱ्यांवर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपयुक्त राजेश आगळे यांनी दिला आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी लग्न, वाढदिवस, स्वागत, निवडणूक, धार्मिक वा अन्य कार्यक्रमांचे फ्लेक्स व फलक लावले जातात. यामुळे केवळ शहर विद्रूपच होत नाही, तर वाहतूक अडथळे निर्माण होतात. यामुळे अशाप्रकारच्या फ्लेक्स, होर्डिंग्ज लावणाऱ्या व्यक्ती, संस्थांवप कारवाई केली जात आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी व शहराध्यक्षांना सूचना करण्यात आली आहे. महापालिकेचा आकाशचिन्ह व परवाना विभाग वतीने वेळोवेळी अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, फलकांवर कारवाई केली जाते. मात्र, नागरिक विविध सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावत आहेत. यामध्ये सण, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दिवाळी असे मोठे सण आहेत.
या पार्श्वभूमीवर शहरात अनधिकृत फ्लेक्स लावण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने यंदा पुन्हा कटाक्ष भूमिका घेतली आहे. नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी. संस्था, व्यापारी, उद्योगपती, राजकीय पक्षांनी महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता जाहिरातीसाठी होर्डिंग्ज, फलक, पोस्टर्स, बॅनर्स लावू नयेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती आगळे यांनी दिली. एप्रिल ते जुलैदरम्यान शहरातून 47 हजार 123 पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले आहेत. यामधून चार लाख 68 हजारांचा दंड वसूल केला आहे, तर एकावर गुन्हा दाखल केला आहे.