बद्ध ही पहिली पायरी, मुमुक्षू ही दुसरी पायरी आणि साधक ही परमार्थमार्गाच्या प्रगतीची तिसरी पायरी हाेय. चुकीचा रस्ताच बराेबर समजून चालणारा ताे बद्ध. रस्ता चुकला हे ज्याला समजले आणि म्हणून ताे चुकीचा रस्ता साेडून याेग्य मार्गाला लागण्याची ज्याला मनापासून तीव्र तळमळ उत्पन्न झाली ताे मुमुक्षू आणि मनातील त्या तळमळीला मूर्त स्वरूप देऊन मनापासून ज्याने याेग्य मार्गाने मार्गक्रमणेला प्रत्यक्ष सुरुवात केली ताे साधक हाेय. ‘साधक निरूपण’ या पाचव्या दशकाच्या नवव्या समासात श्रीसमर्थांनी अशा साधकाची तळमळ, प्रयत्न आणि त्याला परमेश्वरी कृपा आणि साधुसंतांच्या आशीर्वादाने येत चाललेले यश यांचे वर्णन केलेले आहे. साधकाला आपले अवगुण माहीत झालेले असतात. त्यामुळे ताे प्रयत्नपूर्वक ते साेडावयाच्या मार्गाला लागताे. एखादा शीघ्रकाेपी माणूस राग आला की, नामस्मरण करून त्या रागावर नियंत्रण ठेवावयाचा प्रयत्न सुरू करताे. पैशाचा लाेभी माणूस ताे लाेभ कमी करण्यासाठी दानधर्म करायला लागताे, तर कपटी माणूस भ्नितमार्गाने आपले अंत:करण शुद्ध करावयाचा प्रयत्न सुरू करताे. ही सर्व खटपट आणि प्रयत्न साेपे नसतात. आतापर्यंत ज्या पद्धतीने आयुष्य बद्धपणाने जगला ती सर्व पद्धत पूर्णपणे बदलावयाची असते. त्यामुळे त्यासाठी खरी तळमळ, दृढ निश्चय आणि अर्थातच संतांचे मार्गदर्शन व परमेश्वरी संकेत आवश्यक असताे.
एखाद्या माणसाला दिवसात 10-12 कप चहा प्यावयाची सवय असली तर ती साेडणे त्याला किती जड जाते, हे आपण पाहताे आणि येथे तर पूर्ण जीवनविचारच बदलावयाचा असताे. देह म्हणजेच मी आहे ही भावना त्यागून मी आत्मरूप आहे, हे ज्ञान दृढ करावयाचे असते.ही अवघड वाट साेपी करण्यासाठी श्रीसमर्थ अनेक साधने सांगतात.