परमात्म्याचे प्रियत्व आले की जनप्रियत्व येत

    21-Aug-2025
Total Views |

परमात्म्याचे प्रियत्व 
 
परमात्म्याने आपल्याला लाेककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात असे काही माणसांना वाटते; पण अमुक एका देहार्माफतच लाेककल्याण व्हावे अशी इच्छा का असावी? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का? शक्ती वापरण्याचे सामर्थ्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित ती देईलही.
 
लहानाच्या हातात तलवार देऊन काय उपयाेग? लाेकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते; पण अजून क्राेध अनावर आहे, मन ताब्यात नाही.असेही म्हणता; तर आधी आपल्या विकारांवर, मनावर, छाप बसवा आणि मग लाेकांबद्दल विचार करा! तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना? मग जनांचा राजा परमात्मा, त्याचे प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपाेआपच येईल. तुम्हांला लाेक वाईट दिसतात; पण त्यांना सुधारायला जाऊ नका; तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लाेक तुम्हाला तसे दिसतात. स्वत:ला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही. लहान मुली बाहुलीबराेबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की, ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात.
 
तुम्हीही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बाेलताे आणि आपणही त्याच्याशी बाेलताे? ही भावना जाे जाे जास्त दृढ हाेईल ताे खराेखर ताे तुमच्याशी बाेलू लागेल. मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हाती आहे, तर जीवनातल्या सर्व घडामाेडी त्याच्याच हातात असणार. भगवंत ज्या ठिकाणी आहे तिथे त्याला शाेधा. आपण सात्त्विक कृत्ये करताे; पण त्यांचा अभिमान बाळगताे.
 
सात्त्विक कृत्ये चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर वाईट. एक वेळ वाईट कृत्ये परवडली; केव्हा तरी त्यांचा पश्चात्ताप हाेऊन मुक्तता तरी हाेईल. पण सात्त्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार? मी आप्त-इष्टांना मदत केली, आणि आप्तइष्ट म्हणू लागले की, ‘यात याने काय केले? परमात्म्याने त्याला दिले म्हणून त्याने मदत केली!’ हे ऐकून मला वाईट वाटते! इथे वास्तविक पाहाता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र ‘मी दिले’ असा अभिमान धरून वाईट वाटून घेताे! परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले हीच सत्य स्थिती असताना मला वाईट वाटण्याचे कारण काय? म्हणून, परमात्म्याच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवावी.