देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन काम करा : मनोज नरवणे

    20-Aug-2025
Total Views |
 
de
 
कोथरूड, 19 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
देशाला 2047 मध्ये महासत्ता बनवायची आहे. त्यासाठी आपण जे काही काम करू ते नियमाप्रमाणे करू, देशाच्या प्रगतीसाठी करू, ही भावना आपल्या आतून यायला हवी. करिअरसाठी जे क्षेत्र निवडाल तिथे चांगले काम करा, असे आवाहन करत स्वातंत्र्याबरोबर आलेल्या जबाबदारीचे भान ठेवा, असा मौलिक सल्ला आणि आवाहन भारतीय सैन्यदलाचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी केले. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता.
 
यावेळी भारतीय सैन्यदलाचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी 700 गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदाचे 23वे वर्षे होते. स्वामी विवेकानंद आणि पंतप्रधान मोदी यांचे पुस्तक, शैक्षणिक साहित्य आणि सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, सिनेदिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील, मोनिका मोहोळ, हर्षाली माथवड, वासंती जाधव, संस्कृती प्रतिष्ठानचे व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना नरवणे म्हणाले, ‌‘ज्या क्षेत्रात असाल तिथे प्रामाणिकपणे, शिस्तीने काम केले तरी ते देशाच्या प्रगतीसाठी केलेले काम असेल. शिस्त नसेल तर त्या स्वातंत्र्याचा काहीही उपयोग नाही. स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच आपण सर्व आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करतो, आपल्या आवडीनुसार आवडत्या क्षेत्रात काम करतो; पण हे स्वातंत्र्य उपभोगताना त्याबरोबर आलेल्या जबाबदारीला विसरून चालणार नाही.‌’
 
मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‌‘आपल्या तरुणांचे भवितव्य उज्ज्वल आहे. हीच तरुण पिढी भारताला पुढे नेईल. आपल्या देशाला सर्वोच्च स्थानी पोहचविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पाहिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी, ज्यांच्या मागे कोणी नाही अशा एक लाख विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचा आपला प्रयत्न आहे. या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आपल्याला भारताचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. गुणवंत विद्यार्थी प्रतिभावंत कसे होतील, यासाठी हा प्रयत्न आहे. ज्यांना मी 23 वर्षांपूर्वी गुणवंत म्हणून वह्या दिल्या त्यांची मुले आज बक्षिसे घ्यायला आली आहेत.‌’