श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई मंडळ मानाच्या पाचही गणपतींच्या पाठोपाठ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार

    02-Aug-2025
Total Views |
 
pun
 
पुणे, 1 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून सहभागी होणारे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि अखिल मंडई मंडळ हे जगभरातील गणेशभक्तांसाठी मुख्य आकर्षण असते. मात्र, यंदा खग्रास चंद्रग्रहण आहे आणि ‌‘श्रीं‌’च्या मूर्तीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला (6 सप्टेंबर) रात्री 12च्या आत होणे आवश्यक आहे. त्यामुळेच मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीच्या पाठोपाठ ‌‘श्रीं‌’च्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय दोन्हीही मंडळांनी घेतला आहे; तसेच येथून पुढेही आम्ही मानाच्या पाच गणपतींच्या पाठोपाठच मिरवणुकीत सहभागी होणार आहोत, अशी माहिती गुरुवारी (31 जुलै) पत्रकार भवन येथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन आणि अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
 
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई मंडळाचे कोषाध्यक्ष संजय मते, सचिव विश्वास भोर, जिलब्या मारुती मंडळाचे अध्यक्ष भूषण पंड्या उपस्थित होते. पुनीत बालन म्हणाले, ‌‘मानाचे पाच गणपती टिळक पुतळा येथून मुख्य मिरवणूक मार्गावर मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. सर्व गणेश मंडळांनी देखील याबाबत सहकार्य करावे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. विसर्जन मिरवणूकही वेळेत संपेल. मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांची संख्या कमी करएयाचाही आम्ही विचार करत आहोत; तसेच मानाच्या गणपती मंडळांसहीत प्रमुख मंडळांच्या पदाधिकार्यांसमवेत आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत. त्यांनादेखील विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्यासंदर्भात विनंती करणार आहोत.‌’
 
अण्णा थोरात म्हणाले, ‌‘गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून, संपूर्ण दहा दिवस त्याचे महत्त्व आहे. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीचा असतो. यावर्षी अनंत चतुदर्शीच्या (6 सप्टेंबर) दुसऱ्या दिवशी (7 सप्टेंबर) खग्रास चंद्रग्रहण आहे. ग्रहणकाळात देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीला रात्री बाराच्या आत ‌‘श्रीं‌’च्या मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे. त्यामुळेच आम्ही यंदापासून मानाच्या पाचही गणपती मंडळांच्या पाठोपाठ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय येथून पुढेही कायम राहील.
 
अखिल मंडई मंडळाच्या ‌‘श्रीं‌’च्या मिरवणुकीत एक बॅन्ड आणि एक ढोल-ताशा पथक असेल. मानाच्या पाचही गणपती मंडळांनी त्यांच्या मिरवणुकीतील लवाजमा कमी करावा, अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. तसेच जिलब्या मारुती मंडळ, बाबू गेनू मंडळाच्या अध्यक्षांसमवेतही आम्ही चर्चा करून विसर्जन मिरवणूक लवकर कशी संपवता येईल यावर चर्चा करणार आहोत. ग्रहण काळ असल्याने सर्व गणेशोत्सव मंडळांना देखील आम्ही आवाहन करीत आहोत की यंदा मिरवणूक लवकर संपविण्यासाठी प्रयत्न करावेत.‌’