भारतीय शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात मैलाचा बदल ठरलेल्या नवीन शैक्षणिक धाेरणाला पाच वर्षे पूर्ण झाली असून, त्या निमित्ताने अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे आयाेजन भारत मंडपममध्ये करण्यात आले हाेते. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी सादर केलेले सादरीकरण सर्वांच्या काैतुकाचा विषय ठरला.केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी विविध राज्यांतील शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, शिक्षणतज्ज्ञ आणि इनाेव्हेटर्स उपस्थित हाेते. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सुकाणू समितीचे सदस्य सचिन जाेशी यांचा यात समावेश हाेता.भुसे व देओल यांनी सादर केलेले सादरीकरण विशेष चर्चेचा विषय ठरले.
या सादरीकरणात महाराष्ट्रात राष्ट्रीय शिक्षण धाेरणाच्या अंमलजावणीसाठी उचललेली धाेरणात्मक पावले, शिक्षक प्रशिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, शालेय मूल्यांकन प्रणाली व भाषिक समावेश यांसारख्या महत्त्वाच्या कामांची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीचे विशेष काैतुक करत अन्य राज्यांनी या माॅडेलचा अभ्यास करावा, असे आवाहन केले.माध्यमिक शिक्षणात सक्रिय सुधारणा या चर्चासत्रात भुसे यांनी भाग घेतला.राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणांतर्गत शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्ती नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्राने राष्ट्रीय शैक्षणिक धाेरण अंमलबजावणीत देशात आदर्शवत कार्य केले असून, अशा शैक्षणिक संमेलनातून शालेय शिक्षणात गुणवत्तात्मक परिवर्तनाची नवी दिशा निर्माण हाेत आहे, असे भुसे यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण व अध्यापनातील बदलांवर सचिन जाेशी यांनी मार्गदर्शन केले.