पुणे, 18 ऑगस्ट (आ.प्र.) :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांचा सामाजिक क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल गोव्यात सर्वोकृष्ट कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गोव्यातील श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण संस्थान, बेती (पिळर्ण) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. श्री शांतादुर्गा मंदिरात झालेल्या समारंभाला खासदार सदानंद तानावडे, साळगावचे आमदार केदार नाईक, भाजपचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, संस्थेचे अध्यक्ष शीतल चोडणकर; तसेच पदाधिकारी व गोवेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महेश सूर्यवंशी यांना सामाजिक सेवा, सांस्कृतिक वारशाची जपणूक, आपत्तीग्रस्तांसाठी कार्य आणि समाजातील एकात्मता वाढवण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निरंतर कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडून येत असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले. गोव्याच्या भूमीने दिलेल्या या मान्यतेबद्दल सूर्यवंशी यांनी आभार मानले.