आमदारांच्या हस्तक्षेपाने लोकमान्यनगर वासीयांचे स्वप्न भंगले

    19-Aug-2025
Total Views |
 
 aa
पुणे, 18 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे ‌‘कोणी नवीन घर देत का घर...‌’ अशी लोकमान्यनगर रहिवाशांची अवस्था झाली आहे. पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने लोकमान्यनगर येथील रहिवाशांनी एकत्र येऊन रविवारी (17 ऑगस्ट) लोकमान्यनगर बचावासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी लोकमान्यनगर येथील सर्व कुटुंबांसहित शेकडो रहिवाशी उपस्थित होते. कृती समितीने आरोप केला की, गेली अनेक वर्षं चर्चेत असलेला लोकमान्यनगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला स्थानिक आमदाराने हस्तक्षेप करून तात्पुरती स्थगिती मिळविल्याने लोकमान्यनगरमधील 803 घरांत राहणाऱ्या लोकांचा स्वप्नभंग झाला. त्यामुळे लोक शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यावेळी स्थानिक लोकांनी म्हाडा, शासन आणि आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
 
aa 
सध्या या ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा, मोडकळीस आलेले बांधकाम, ड्रेनेजची झालेली दुरवस्था अशा अनेक अडचणींचा सामना दैनंदिन जीवनात करावा लागत आहे. त्यात पुन्हा पुनर्विकासाला स्थगिती मिळाल्याने लोकमान्यनगरची अवस्था बिकट झाली आहे.लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने म्हाडाचे संबंधित अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्यात येत आहे. लोकमान्यनगर येथे काही सोसायट्यांनी स्वतःचा विकासक नेमला, इमारती तयार झाल्या. लवकरच रहिवासी राहावयास जाणार आहेत. तर दुसरीकडे मात्र यामध्ये मित्तल बिल्डर्सचे डॉ. नरेश मित्तल यांनी 42, 43, 44, 45 सदरील चारही मिळून सोसायटी केली.
 
म्हाडाने करोडो रुपये घेऊन परवानगी दिली. तरीदेखील स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर देशपांडे बिल्डर्स हे इमारत क्रमांक 36, 37, 39 तसेच मानव बिल्डर्स इमारत क्रमांक 34, 35 जोगळे बिल्डर्स इमारत क्रमांक 11, 11 अ, 12 गौतम ढवळे आयकॉन डेव्हलपर्स यांच्याकडे इमारत क्रमांक 1, 2, 3, 4 म्हाडाकडे परवानगीसाठी कायदेशीर कागदपत्रे देऊनदेखील म्हाडाने कामाला खीळ घातली आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. इमारत क्रमांक 15 व 53 श्रीकांत उणेचा बिल्डर्स यांच्या म्हाडाकडे परवानगीसाठी अंतिम टप्प्यात आहे. तसेच इतर सोसायट्यादेखील विविध बिल्डरशी पुनर्विकासाठी चर्चा व प्रयत्नशील आहेत. शासन जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असून, हा लढा भविष्यात तीव्र होणार असल्याचे पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी लोकमान्यनगर येथील अनेक रहिवासी कुटुंबांसहित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
लोकमान्यनगर येथे 1960 ते 1964 या चार वर्षांत 53 इमारती उभ्या राहिल्या. सध्या या ठिकाणी 803 फ्लॅटधारक आहेत. त्या काळात या सर्व इमारती लोडबेरिंगच्या करण्यात आल्या होत्या. सध्या मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी सिमेंट प्लास्टर पडले असून, भिंतींमध्ये झाडे उगवली आहेत. स्लॅब पडले असून काही स्लॅब गळत आहेत, तर भिंतींना चिरा पडल्या आहेत. काही इमारती तिरक्या झाल्या आहेत. अशा नरकयातना सोसत येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहात आहेत. येथील सर्व इमारती को-ॲापरेटिव्ह सोसायटी रजिस्टर झाल्या आहेत. त्यांचे प्रॉपर्टी कार्ड व नोंदणी झाली आहे. सेल डीड, लीस डीड, कन्व्हेन्स डीड झाले असूनदेखील म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.