देशातील पहिली जागतिक बाजारपेठ पालघर जिल्ह्यातील वाढवणमध्ये उभारण्यात येणार असून, या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.पणन विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसा प्रस्ताव पाठवला असून, त्यावर तातडीने पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.बाजार समित्यांमध्ये शेतमाल येताे आणि तेथून ताे ग्राहकांपर्यंत पाेहाेचताे, ही आजवरची व्यवस्था. राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ राज्यातच उपलब्ध व्हावी, असा प्रयत्न आजवर झाला नाही. राज्याची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत एक ट्रिलियन डाॅलरची करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी समाेर ठेवले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी कृषीक्षेत्राचे माेठे याेगदान घ्यायचे, तर कृषिमाल देशाबाहेर जाणे आणि त्यातून अर्थव्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. पणन मंत्री जयकुमार रावल नुकतेच पॅरिसला गेले हाेते.
तेथील जगप्रसिद्ध रुंजिस मार्केटने महाराष्ट्रात जागितिक बाजारपेठ उभारण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आणि परस्पर सामंजस्य कराराचा मसुदाही पणन विभागाकडे पाठवला आहे. या बाजारपेठेची केवळ फळे, भाजीपाल्याची वार्षिक उलाढाल 22 हजार काेटींची आहे.वाढवणमध्ये भव्य बंदराची उभारणी केली जाईल. साेबतच तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जाणार आहे. वाढवणपासून समृद्धी महामार्गाला जाेडणारा मार्गही बांधण्यात येईल.त्यामुळे देशांतर्गत आणि विदेशांशी जाेडले जाणारे आदर्श ठिकाण म्हणून वाढवणचा विकास हाेणार आहे.तेथे जागतिक बाजारपेठ साधारणतः पाचशे एकरांत उभारून अत्याधुनिक सुविधा दिल्या जातील. त्यात कृषी मालाची साठवणूक, प्रक्रिया, पॅकेजिंग आदींची जागतिक दर्जाची सुविधा असेल. वाढवणमध्ये त्या दृष्टीने जागेसाठीची चाचपणीही पणन विभागाने सुरू केली आहे.या बाजारपेठेतून कृषिमाल काही तासांत परदेशात पाेहाेचवता येणार आहे. त्याचवेळी नवी मुंबई परिसरात अशी बाजारपेठ उभारण्याचा पर्यायही खुला ठेवला आहे.