पुणे, 16 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या श्री गणेश अभिषेक सेवेला गेल्या वर्षी मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे यावर्षी देखील हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार भाविकांना ऐच्छिक देणगीच्या माध्यमातून ही सेवा मिळणार असून, त्यासाठी नावनोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गेल्या 134 वर्षांपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा होतो. त्या निमित्ताने ट्रस्टकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र, उत्सवात श्री गणेशाची अभिषेक सेवा सुरू व्हावी, अशी मागणी भाविकांकडून सातत्याने होत होती.
भाविकांच्या या मागणीचा मान राखत अखेर ट्रस्टने गेल्या वर्षीपासून अभिषेक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. हीच परंपरा यावर्षी देखील पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे. ट्रस्टतर्फे सांगण्यात आले की, दहा दिवसांच्या उत्सव कालावधीत पहाटे 5 ते 11 या वेळेत भाविकांना बाप्पाचा अभिषेक करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या श्री गणेश अभिषेकासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क निश्चित करण्यात आलेले नाही. भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार देणगी देऊन अभिषेक करता येणार आहे, अशी माहिती उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी दिली.
ज्या भाविकांना अभिषेक करायचा आहे, त्यांना आधी नावनोंदणी करून वेळ निश्चित करता येणार आहे.
ऐच्छिक अभिषेक करण्यासाठी भाविकांना http://bit.ly/abhishek2025 या लिंकवर जाऊन नावनोंदणी करता येणार आहे.
नावनोंदणीसाठी काही अडचण आल्यास 9049233029 किंवा 9890994182 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नावनोंदणी करू न शकलेल्या भाविकांनादेखील अभिषेक करायचा असेल, तर थेट उत्सव मंडपात उपलब्ध वेळेनुसार अभिषेक करता येणार आहे.
भाविकांच्या मागणीनुसार गेल्या वर्षीपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची अभिषेक सेवा सुरू केली आहे. या सेवेला गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यावर्षी देखील ही ऐच्छिक अभिषेक सेवा सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. भाविक यावर्षी देखील या सेवेचे स्वागत करतील आणि सेवेचा लाभ घेतील असा विश्वास आहे.
-पुनीत बालन (उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती)