अनेक लाेक सगळ्यात साेपा व्यायाम म्हणून दिवसातून एखादा तास माॅर्निंग किंवा इव्हनिंग वाॅक घेतात. हा व्यायाम करून, आहार नियंत्रण करून वजन कमी झालं तरी पाेट कमी हाेत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. त्याचं कारण फिटनेस तज्ज्ञ डाॅ. मल्हार गानला सांगतात.ते म्हणतात की चालण्याने हृदयाचं आराेग्य उत्तम राहतं, पाय मजबूत राहतात, पण राेजच्या जेवणात पुरेशा प्रथिनांचा समावेश नसला तर माणूस बेढब हाेताे. मांसाहारींना प्रथिनांसाठी सर्व प्रकारचं मांस आणि अंडी उपलब्ध असतात. पण तेही राेज खाल्लं जाईल असं नसतं. (अलीकडे अनेक मांसाहारी मंडळींना आपला आहार पापयुक्त आहे असं वाटून पापमुक्त आहार म्हणजे शाकाहार करण्याची ओढ लागते, काहींची शाकाहारी व्रतवैकल्यं असतात.
वृक्षवल्लीही साेयरी वनचरेच आहेत, त्यांनाही जीव आहे, रक्त मांस दिसत नसलं म्हणून काय झालं, हे त्यांच्या लक्षात येत नाही. असाे.) शाकाहारी मंडळींना राेज पनीर, टाेफू, डाळी एवढ्या प्रमाणात खाता येत नाहीत.त्यामुळे चालणाऱ्यांनी चाळिशीनंतर प्रथिनांची कमतरता सप्लिमेंट्सनी भरून काढावी. शिवाय, चालताना घामावाटे शरीरातलं मीठ कमी हाेतं. त्याची भरपाई करण्यासाठी लिंबूपाणी मीठ घालून प्यावं. नाहीतर संध्याकाळी खारट स्नॅक्सची ओढ लागते आणि ते तळलेले पदार्थ पाेटाचं ढेरीत रूपांतर करतात.