पुणे, 14 ऑगस्ट (आ.प्र.) :
पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या एमएमसी इंडिया संघाने आंतरराष्ट्रीय गणित (आयएमसी) 2025 स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, आपल्या पहिल्याच सहभागात 27वा क्रमांक पटकावत जागतिक स्तरावर ठसा उमटविला आहे. याशिवाय संघातील आत्मदीप सेनगुप्ता (दुसरा क्रमांक-55 गुण), सौरदीप कांजिलाल (दुसरा क्रमांक-51 गुण), अंशुमन अग्रवाल (दुसरा क्रमांक-46 गुण), तर अर्णब सन्याल (तिसरा क्रमांक-42 गुण) या विद्यार्थ्यांनीही आपल्या कामगिरीची चमक स्पर्धेत दाखवून दिली.
याबरोबरच संघाचे प्रा. व्ही. एम. सोलापूरकर (भास्करचार्य प्रातिष्ठान) यांचाही स्पर्धेत प्रभावी संघप्रमुख म्हणून विशेष सन्मानही स्पर्धेदरम्यान करण्यात आला. बल्गेरियातील ब्लागोएव्हग्राड येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठीय गणित स्पर्धेत जगभरातील 73 विद्यापीठांचे 430 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. एमएमसी इंडिया संघासाठी हा पहिलाच सहभाग असूनही, त्यांनी या यशाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली. प्रा. व्ही. एम. सोलापूरकर आणि प्रा. बी. सुरी या दोघांनी भारतीय संघाला मार्गदर्शन केले. त्यांच्या तंत्रशुद्ध तयारीमुळे आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करता आली.
स्पर्धेसाठी संघाची निवड भास्कराचार्य प्रतिष्ठान, पुणे आयोजित माधव गणित स्पर्धा या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतून झाली होती. ही स्पर्धा 2009-2010 पासून देशाच्या विविध भागांमध्ये आयोजित केली जाते. 2025 मध्ये सुमारे 4000 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. एमएमसी इंडिया संघाची ही सहभागिता राष्ट्रीय उच्च गणित मंडळ यांच्या आर्थिक साह्यमुळे शक्य झाली.