खड्ड्यांबाबतच्या तक्रारी थेट मोबाइल ॲपद्वारे करा

    14-Aug-2025
Total Views |
 
 dddd
 
पुणे, 13 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांना थेट महापालिकेला पीएमसी रोड मित्र या मोबाइलवर छायाचित्रासह तक्रार करता येणार आहे. या तक्रारीनुसार 72 तासांत खड्डा बुजविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत महापालिकेच्या पथ विभागाने खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी मोबाइलवर मागवून त्याचे निराकरण तातडीने करण्यासाठी महापालिकेने पीएमसी रोड मित्र हे ॲप विकसित केले आहे. या ॲपचे उद्घाटन आज महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आले.
 
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह पथ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्त म्हणाले, हे ॲप शहर खड्डेमुक्त करण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल ठरेल. सध्या पीएमसी केअर, ई-मेल आणि आपले सरकारकडून खड्ड्यांबाबतच्या तक्रारी येतात परंतु त्यावर कोणतीही प्रभावी कारवाई केली जात नाही. हे ॲप नागरिकांना त्यांच्या समस्या नोंदवण्याचा अधिकार तर देईलच, शिवाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार आहे. जर या ॲपचा प्रभावीपणे वापर केला, तर पुण्यातील रस्त्यांची स्थिती लवकरच सुधारू शकते. डॅशबोर्डवरून देखरेख केली जाणार रस्ते विभागाच्या प्रमुखांना ॲपच्या डॅशबोर्डद्वारे कोणत्या क्षेत्रातून किती तक्रारी आल्या, कोणत्या अधिकाऱ्याने त्यावर काम केले किंवा नाही, याची माहिती मिळेल. यामुळे अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होईल. कोणताही अधिकारी निष्काळजी असेल तर ते देखील स्पष्टपणे उघड होईल.
 
पीएमसी रोड मित्र ॲप कसे काम करेल?
महापालिकेच्या पथ विभागाने विकसित केलेले हे अँड्रॉइड मोबाइल ॲप सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ॲपद्वारे नागरिक कोणत्याही खड्ड्याचा फोटो किंवा व्हिडिओ काढून त्याच ठिकाणावरून ॲपवर अपलोड करायचा आहे. ही तक्रार संबंधित पथ विभागाच्या अभियंत्याकडे जाईल. महापालिकेला फोटोसह स्वयंचलित स्थान डेटा मिळेल, ज्यामुळे खड्ड्याचे अचूक स्थान ओळखण्यास मदत होईल. तक्रार अभियंत्याकडे पोहोचताच तक्रारदारास मेसेज येईल. खड्डा बुजवल्यानंतर अधिकारी त्याच ठिकाणावरून फोटोऍपवर अपलोड करतील. त्यामुळे खड्डा बुजवल्याचे तक्रारदारालाही समजेल.