मुंबई, 13 ऑगस्ट (आ.प्र.) :
शून्य विद्युत अपघातांसाठी जनजागृती अभियानातील विविध उपक्रमांत लोकसहभागाचे महावितरणने नवीन पाच विक्रम नोंदवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या दोन्ही संस्थांच्या वतीने पाचही विक्रमांच्या नोंदीचे प्रमाणपत्र व सन्मानपदक प्रदान करून महावितरणचा गौरव करण्यात आला. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या संकल्पनेतून विद्युत सुरक्षा अभियान राबवण्यात आले. या अभियानातील लोकसहभागाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतल्याबद्दल त्यांनी सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. येथे झालेल्या कार्यक्रमात एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या परीक्षक कश्मिरा शाह यांनी विद्युत सुरक्षा अभियानातील लोकसहभागाच्या पाच विक्रमांची घोषणा केली.
त्यांनी या दोन्ही संस्थांच्या वतीने संचालक राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत, प्रसाद रेशमे, स्वाती व्यवहारे यांना प्रमाणपत्र व सन्मानपदक प्रदान करून महावितरणचा सन्मान केला. लोकसहभागातून शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या अभियानाची व्याप्ती आणखी वाढवण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. महावितरणने यंदा 20व्या वर्धापन दिनानिमित्त 1 ते 6 जूनदरम्यान विद्युत सुरक्षेच्या जनजागृतीसाठी राज्यभरात विविध उपक्रम आयोजिले होते. यात सुरक्षा संदेश देणाऱ्या मॅरेथॉनमध्ये 11881, ऑनलाइन प्रश्नमंजूषेत 96150, शालेय निबंध व चित्रकला स्पर्धेत 7593, विद्युत सुरक्षेच्या रॅलीत 27155 जण सहभागी झाले होते. 6 जूनला एकाचवेळी 42201 जणांनी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली.
यासह महावितरणकडून 1 कोटी 92 लाख 79 हजार ग्राहकांना नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएसद्वारे, तर 35 लाख 73 हजारांवर ग्राहकांना नोंदणीकृत ई-मेलद्वारे विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यात आला. या सर्व उपक्रमांत 2 लाख 11 हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला. भागवत यांनी या अभियानाची माहिती दिली. उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी सूत्रसंचालन केले.