वीजबिलाच्या नावात बदल आता घरबसल्या होईल

    13-Aug-2025
Total Views |
 
 
ma
पुणे, 12 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
खरेदी-विक्री, बक्षीसपत्र, मृत्यू, वारसा आदी कारणांमुळे मिळकतीच्या मालकी हक्कात/नावात बदल होत असतो; तसाच बदल ग्राहकाला त्याच्या वीजबिलावरील नावातही करावा लागतो. नावात बदल करण्यासाठी ग्राहकांना आता घरबसल्या व ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. महावितरणच्या मोबाइल ॲपवर d wss पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध आहे. महावितरणच्या बहुतांश ग्राहक सेवा मोबाइल ॲप व संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ग्राहकाला स्वत:चा यूजर नेम आयडी तयार करून घरबसल्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येतो.
 
नवीन वीजकनेक्शनसाठी अर्ज, वीजबिल पाहणे, भरणे, तक्रार नोंदवणे, त्याचा पाठपुरावा, रीडिंग नोंदवणे, वीजबिल भार कमी/जास्त करणे, जुन्या बिलांचा इतिहास, बिल कॅलक्युलेटरसह नावात बदल करणे ही प्रमुख सुविधा मोबाइल ॲप; तसेच https://wss.mahadiscom.in/ wss/wss या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. खरेदी-विक्री, बक्षीसपत्र, मृत्यू, वारसा, विभक्त कुटुंबपद्धती आदींमुळे मिळकतीच्या नावांत बदल केले जातात. मालकी हक्कात नाव बदलल्यास इतर विभागांप्रमाणे वीजबिलाच्या नावात बदल करणेही गरजेचे असते. त्यासाठी पूर्वी कार्यालयात जाणे अपरिहार्य होते. मिळकतीचे नाव बदलल्याचा पुरावा व सुरक्षा ठेव नवीन ग्राहकांच्या नावे करण्यासाठी फॉर्म एक्सचा फोटो काढून अपलोड केला की नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होते. येणाऱ्या बिलात नाव बदलून येते.
 
महावितरण ॲप इन्स्टॉल केल्यास सर्वप्रथम भाषा निवडावी. नोंदणी करण्यासाठी सदस्य बना/Don’t have account sign up वर क्लिक करावे. त्यानंतर 12 अंकी वीजग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक, ई-मेल, लॉगइन आयडी व पासवर्ड टाकून नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर लॉगइन केल्यास सर्व परवानग्या स्वीकाराव्यात म्हणजे आपले ॲप विनासायस काम करू शकेल. ॲपच्या डाव्या कोपऱ्यात सेवांची लिंक दिली आहे. त्यात बरेच पर्याय आहेत. पैकी नाव बदलाची मागणी पर्याय निवडावा. बदल करावयाची किंवा नवीन मालकाची माहिती भरावी. माहिती अपलोड होताच नोंदणी क्रमांक मिळतो.