सौरऊर्जेमुळे औद्योगिक वीजदर कपात करणे शक्य झाले

    12-Aug-2025
Total Views |
 
 so
पुणे, 11 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
आतापर्यंत आपण दरवर्षी वीज दरवाढ करत आलो आहोत; परंतु इतिहासात पहिल्यांदाच आपण औद्योगिक वीजदरात कपात केली आहे. दरवर्षी सरासरी 1.9 टक्क्यांप्रमाणे पुढील पाच वर्षांत 10 टक्केदर कमी होतील; तसेच उद्योगांची भविष्यातील वाढ लक्षात घेऊन प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी उद्योजकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले. गणेशखिंड येथील महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयात पुण्यातील उद्योजक संघटनांसोबत लोकेश चंद्र यांनी संवाद साधला.
 
यावेळी महावितरणचे संचालक सचिन तालेवार, योगेश गडकरी, संचालक राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत व दिनेश अग्रवाल, भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे याच्यासह शहरातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुण्यातील उद्योजकांची वाढती वीज मागणी लक्षात घेता महावितरणने एमआयडीसीकडे नवीन वीज उपकेंद्रांसाठी जागेची मागणी केली आहे. एमआयडीसी याबाबत सकारात्मक असून, सर्वे करून नवीन जागेचा शोध घेतला जाईल.
 
नवीन जागांसाठी महावितरण आग्रही आहे; तसेच नव्याने विस्तारित होणाऱ्या औद्योगिक वसाहतींचा बृहत आराखडा तयार करतानाच वीज उपकेंद्रांसाठी जागेचे आरक्षण टाकण्यात यावे, यासाठीही महावितरण पाठपुरावा करत आहे. उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरणने स्वागत कक्ष सुरू केला आहे. प्रत्येक मंडल कार्यालय स्तरावर हा कक्ष कार्यरत असून, उद्योजक व महावितरणमधील समन्वय वाढून वीजसेवा गतिमान होण्यास मदत होणार आहे. अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता महिन्यातून एकदा स्वागत कक्षाची बैठक घेऊन समस्या मार्गी लावतील, असे लोकेश चंद्र यांनी सांगितले.