पुण्यात आणखी नवीन पाच पोलीस ठाणी होणार; हजार नवे पोलीस कर्मचारी मिळणार

    12-Aug-2025
Total Views |
 
 pu
पुणे, 11 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
पुणे पोलीस प्रशासनाने आणखी पाच पोलीस ठाणी मागितली आहेत. ती पाचही पोलीस ठाणे पुण्यासाठी देऊ. त्याचबरोबर त्या ठाण्यांसाठी एक हजार कर्मचारी नियुक्त करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. पुण्याचा आर्थिक विकास होत असून, पुण्यात देशातील सर्वांत आधुनिक सीसीटीव्ही प्रणाली बसविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. पुणे शहर पोलिस आयुक्तालयामार्फत आयोजिलेल्या कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते चंदननगर पोलीस ठाण्याची नवीन इमारत, दृष्टी इंटीग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरचे उदघाटन, मोबाइल सर्व्हेलन्स व्हॅन आणि ड्रोनचे लोकार्पण, आयटीएमएस यंत्रणेची उद्घोषणा करण्यात आली.
 
मिशन परिवर्तन मोहिमेचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपर मुख्य सचिव (गृह) इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‌‘पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी, येवलेवाडी अशा पाच पोलीस स्टेशनची मागणी केली असून, त्यास मंजुरी देण्यात येईल. त्यासाठी लागणाऱ्या एक हजार मनुष्यबळाला मान्यता देण्यात येईल. यापूर्वी पुण्याने सात पोलीस स्टेशन मागितले होते. ते मंजूर करण्यात आले. त्यापैकी चंदननगर येथील इमारतीचे उद्घाटन केले असून, अन्य चार पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले.
 
राज्य शासनाने शहरासाठी एकावेळी सात पोलीस स्टेशन मंजूर करण्याची ही राज्यात पहिलीच वेळ आहे. पुणे शहराचा विस्तार आणि औद्योगिक, शैक्षणिक महत्त्व लक्षात घेता शहराची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे. पोलिसांसमोरील आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेऊन 60 वर्षांनंतर पोलीस दलाचा नवीन आकृतिबंध तयार केला. पोलीस स्टेशनची नवी रचना, नार्कोटीक्स, फॉरोन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे.‌’ अजित पवार म्हणाले, ‌‘शासनाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राज्यात 22 हजार कोटी रुपये दिले. त्यातील पाच टक्के म्हणजे अकराशे कोटी रुपये पोलीस दलासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागासाठी पोलीस दलाला डीपीसीच्या माध्यमातून 40 कोटींचा निधी देण्यात आला.
 
शहर पोलीस दलाला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.‌’ अमितेश कुमार यांनी प्रास्ताविकात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले, ‌‘पुणे शहर पोलीस दल सक्षमीकरणासाठी शासनाने मागील तीन वर्षांत एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. सीसीटीव्ही प्रकल्पासाठी 2 हजार 800 कॅमेरे आणि इंटिग्रटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरसाठी साडेचारशे कोटींच्या खर्चाला मान्यता दिली. 22 घाट आणि टेकड्यांवर सुरक्षा कवच मजबूत करण्यासाठी 80 कोटी रुपयांचा निधी दिला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 150 वाहनांना मंजुरी देण्यात आली आहे.
 
पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसाठी 200 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे.‌’ पोलिसांनी 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे विश्लेषण करून धाराशीव येथून सुखरूप परत आणलेल्या कात्रज येथील कोमल काळे या दोन वर्षांच्या मुलीचा सत्कार मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात योगदान देणाऱ्या पोलिसांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थित महिलांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राखी बांधली. पोलीस ठाण्यासाठी साह्य करणारे सतीश मगर, दर्शन चोरडिया, अभय मुंदडा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
 
पवारांनी गृहसचिव चहल यांना झापले
जिल्हाधिकारी कार्यालयासाठी बंडगार्डन पोलीस ठाण्याची जागा तातडीने द्यावी, तसेच औंध येथील पोलीस ठाण्याची जागाही रस्ता रुंदीकरणासाठी तातडीने द्यावी, असा थेट इशारा अजित पवार यांनी अपर मुख्य सचिव (गृह) इक्बालसिंह चहल यांना दिला. ते म्हणाले, ‌‘पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या बाबतची फाईल पाठविली आहे. मी त्वरित निर्णय घेतो. चहल तुम्हाला मी सांगतो, की याबाबत तुम्ही त्वरित निर्णय घ्यावा. मी सार्वजनिक कामे सांगतो. कधीही राजकीय हस्तक्षेप करीत नाही. हिंजवडी येथे वाहतुकीचा प्रश्न सोडविताना आम्हाला वाईटपणा घ्यावा लागतो. त्यावेळी ते औंध येथील रस्त्यावर आलेल्या पोलीस चौकीकडे लक्ष वेधतात.
 
फडणवीस म्हणाले...
पाच आधुनिक कंट्रोल व्हॅनचे लोकार्पण
व्हॅनमध्ये 360 डिग्रीचे कॅमेरे, ड्रोनच्या साह्याने मॉनिटरिंग करणार
चंदननगर पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन
नांदेड सिटी, लोणी काळभोर, खराडी आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन
वाहतुकीसाठी अर्बन मोबॅलिटी प्लॅन राबविणार
विधिसंघर्षित बालकांचे जीवन सुधारण्यासाठी परिवर्तन उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन
पुण्यात आणखी दोन पोलीस उपायुक्त नियुक्त करणार