टर्मिनेटर हा जेम्स कॅमेरून दिग्दर्शित सिनेमा जगभरात एवढा व्यवसाय करेल, अशी कल्पना कुणी केली नव्हती. टर्मिनेटर 2 (जजमेंट डे) या सिनेमाने तर पहिल्या सिनेमाच्या वर कडी करणारी आशयात्मक, कथात्मक आणि तांत्रिक झेप घेतली हाेती. या सिनेमात अरनाॅल्ड श्वार्तझनेगरच्या व्यक्तिरेखेचं अभिन्न अंग बनली हाेती त्याची हार्ले डेव्हिडसन बाइक. महागड्या, अवजड, प्रचंड आवाजाच्या आणि कमालीच्या ताकदवान हार्ले डेव्हिडसनची फॅटबाॅय ही श्रेणी त्यावेळी प्रचंड लाेकप्रिय हाेती. अरनाॅल्ड या सिनेमात बाइक वापरणार हे लक्षात आल्यावर सिनेमाच्या कर्त्यांनी हार्ले डेव्हिडसनशी संपर्क साधून त्यांच्या फॅटबाॅयची कस्टमाइझ्ड बाइक तयार करून मिळेल का, अशी विचारणा केली.
हार्ले डेव्हिडसनच्या संचालकांना माहिती हाेतं की टर्मिनेटरच्या दुसऱ्या भागात अरनाॅल्डच्या व्यक्तिरेखेबराेबर आपली बाइक झळकली, तर जाहिरात करण्याची गरजच पडणार नाही. त्यांनी एक अख्खी टीम टर्मिनेटरसाठी हवी हाेती तशी बाइक बनवण्याच्या कामाला लावली. ती बाइक वेगवेगळ्या सीन्समध्ये असणार, काही बिघाड झाला तर गडबड नकाे म्हणून तशा सहा बाइक्स बनवून टर्मिनेटरच्या दिमतीला दिल्या हाेत्या. पूर्णपणे फुकट.टर्मिनेटर 2च्या या पाेस्टरवरही बाइक आहे. याचा हार्ले डेव्हिडसनला प्रचंड फायदा झाला. फॅटबाॅय टर्मिनेटर एडिशनला आलेली प्रचंड मागणी पुरवण्यासाठी नव्या तीन फॅक्टऱ्या बांधाव्या लागल्या.