मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजना 2.0 ही महत्त्वाकांक्षी याेजना आहे. सप्टेंबरपर्यंत 5000 मेगावाॅटचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी याेजनेतील कामांत काेणत्याही प्रकारची दिरंगाई हाेता कामा नये. या याेजनेचे राज्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी कामे गतीने व कालबद्ध नियाेजन करून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनेसाठी जमीन उपलब्धता आणि इतर आनुषंगिक विषयांसंदर्भात आयाेजित बैठकीत मुख्यमंत्री बाेलत हाेते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बाेर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला उपस्थित हाेते. खासगी आणि शासकीय जागेत विकसित हाेणाऱ्या साैर प्रकल्पांसाठी स्थानिक यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. जिल्हास्तरीय टास्क फाेर्सने या याेजनेच्या वेळाेवेळी हाेणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घ्यावा. कामे करण्यासाठी नाहरकत दाखले, विकासकांना येणाऱ्या अडचणी प्राधान्याने साेडवाव्यात. या याेजनेतून सप्टेंबरपर्यंत पाच हजार मेगालाॅटपर्यंत वीज उपलब्ध हाेईल याप्रकारे जिल्हानिहाय कामांना गती द्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.