अहिल्यानगरमध्ये लवकरच संविधान भवन उभारणार

    01-Aug-2025
Total Views |
 
 
bhavan
शहरात लवकरच भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला साजेसे संविधान भवन उभारले जाईल.यासाठी जिल्हा नियाेजन समिती निधीतून 5 व राज्य शासनाकडून 10, असा एकूण 15 काेटींचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.शहरातील मार्केट यार्ड चाैक परिसरात महापालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पवार बाेलत हाेते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, काशीनाथ दाते, जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पाेलीस अधीक्षक साेमनाथ घार्गे, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, अनुसूचित जाती आयाेगाचे सदस्य अ‍ॅड. गाेरक्ष लाेखंडे, माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, माजी खासदार प्रा. जाेगेंद्र कवाडे, भन्ते राहुल बाेधी आदी यावेळी उपस्थित हाेते.
 
संविधान बदलले जाईल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, संविधान कधीही बदलेले जाणार नाही.जगातील सर्वाेत्कृष्ट संविधान डाॅ.आंबेडकरांनी दिले. त्यांनी गरीब, वंचित व शाेषित घटकांना समानतेचा हक्क बहाल केला. यावर्षी सामाजिक न्याय विभागासाठी 25 हजार काेटींची भरीवतरतूद करण्यात आली आहे, असे पवार यांनी सांगितले. जगताप यांनीही मनाेगत व्यक्त केले. आयुक्त यशवंत डांगे यांनी शहरात पालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विकास कामांचे सादरीकरण केले.कार्यक्रमापूर्वी गायक आनंद शिंदे यांच्या संगीत पथकाने आंबेडकरी गीतांचा कार्यक्रम सादर केला. शिंदे यांनी सादर गीतांनी उपस्थित श्राेते मंत्रमुग्ध झाले. जय भीमच्या जयघाेषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला हाेता.