ज्ञानेश्वरमहाराज किती रसिकतेने दृष्टांत देतात हे या ओवीवरून समजेल.युद्धभूमीवर आपले मामे, काके, सखेसाेयरे, आप्तजन व गुरू यांना पाहून अर्जुनाचे मन विषण्ण झाले. त्याच्या मनातील वीरवृत्ती नष्ट झाली. क्षत्रियाचा धर्म संपला.अर्जुनातील या बदलाचे आश्चर्य श्रीकृष्णांनाही वाटले. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचे अंतरंग जाणले व ते काही न बाेलता स्तब्ध राहिले. अर्जुन पुन्हा सैन्याकडे पहात हाेता.आपले चुलते, आजे, गुरुजन, भाऊ, मामे यांच्याकडे त्याने पाहिले. आपले प्रेमळ मित्र, आपलीच मुले या भूमीवर त्याला दिसली. आपले हितकर्ते, सासरे, सखे, साेयरे, मुलगे नातू इत्यादींना पाहून अर्जुनाच्या मनात गहिवर निर्माण झाला.ज्यांच्यावर आपण संकटात उपकार केले, वाईट काळी ज्यांचे आपण रक्षण केले, अशी वृद्ध मंडळीत्याच्या नजरेस पडली.
दाेनही सैन्यांत आपलेच गाेत्रज व आप्त आहेत, आणि ते युद्ध करावयास उत्सुक आहेत. असे त्याच्या ध्यानात आले. आपल्याच आप्तजनांना पाहून अर्जुनाचे मन व्याकुळ झाले.त्याच्या मनात दया निर्माण झाली.या दयेस पाहून अर्जुनाच्या मनातील मूळच्या वीरवृत्तीचा अपमान झाला आणि ती त्याच्यामधून निघून गेली. या प्रसंगी ज्ञानेश्वरांनी राेजच्या व्यवहारातील एक सुंदर दृष्टांत वरील ओवीत दिला आहे. खरेच आहे, उत्तम कुलातील मुलगी, गुणांनी व लावण्याने युक्त अशी ही तरुणी इतर स्त्रीचा वरचष्मा कधीही सहन करणार नाही, असे ज्ञानेश्वरांना वरील ओवीत सांगावयाचे आहे.नूतन स्त्रीच्या प्रेमात पडलेला कामी पुरुष पहिल्या स्त्रीला विसरताे आणि भ्रमिष्टाप्रमाणे नव्या स्त्रीच्या नादी लागताे किंवा सिद्धी प्राप्त झाल्यानंतर बुद्धीला भ्रम निर्माण हाेताे, त्याप्रमाणे अर्जुनाच्या अंत:करणात आप्तांबद्दल करुणा निर्माण झाली आणि त्याच्या मनातील वीरवृत्ती त्याला साेडून गेली. (क्रमशः)