क्षत्रियधर्माचे ज्ञान सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास बुद्धियाेग म्हणजेच कर्मयाेग समजावून सांगत आहेत. यामुळे कर्म केले तरी ते बंधनकारक हाेत नाही. ज्याप्रमाणे युद्धात अंगावर कवच घालून उभे असता बाणांचा वर्षाव सहन करता येताे, त्याप्रमाणे ऐहिक सुखाची प्राप्ती हाेते आणि शेवटी माेक्ष व भगवद्प्राप्ती यांचाही लाभ हाेताे. स्वधर्माचे आचरण करावे, पण त्याच्या फळाची मात्र आशा धरू नये हा आणखी एक सिद्धांत भगवंत या ठिकाणी सांगतात. सद्बुद्धीच्या ठायी पापाचा अथवा पुण्याचा प्रवेश हाेत नाही.ती अढळ असल्या कारणाने सत्त्वादि त्रिगुणांचा तिला स्पर्श हाेत नाही. अशी सद्बुद्धी थाेडी जरी प्रकट झाली तरी जन्ममृत्यूंची भीती नाहीशी हाेते.ज्याप्रमाणे दिव्याची ज्याेत लहान असली तरी प्रकाश मात्र भरपूर देते, त्याप्रमाणे ही सद्बुद्धी अल्प असली तरी आत्मप्रकाश देणारी आहे.
विचारी पुरुषाने हिची प्राप्ती करून घ्यावी अशी ही सद्बुद्धी जगात दुर्लभ आहे. दगडाप्रमाणे परीस काेठेही सापडणार नाही. अमृताचा थेंबही दैवेयाेगेच प्राप्त हाेताे. त्याप्रमाणे सद्बुद्धी दुर्लभ आहे. तिचा प्रवाह आणि तिचा शेवट शेवटी परमात्म्यातच हाेताे तिला ईश्वरावाचून दुसरे काहीही आवडत नाही. बुद्धिरहित विषयांवर विचारी लाेक कधीच मन जडवीत नाहीत. म्हणून अर्जुना, विषयासक्त बुद्धीमुळे अविचारी लाेकांना स्वर्ग, संसार अथवा नरक अशा गती मिळतात. माेक्षाचा अनुभव त्यांना कधीच येत नाही. गीतेतील हा बुद्धियाेग म्हणजे कर्मयाेग श्रीकृष्णांनी अर्जुनाला वारंवार समजावून दिला आहे. या बुद्धिच्या प्रकाशामुळेच सर्व अडचणी दूर हाेतात, मार्ग स्वच्छ दिसताे असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे.