आपण स्वप्ने काेणतीही पाहत रहा. आपण लिंबाेणी पेरली आहेत आणि त्याला कुठली स्वादिष्ट, मधुर फळे लागणार आहेत. असे स्वप्न कदाचित आपण पाहत असाल, पण आपल्या स्वप्नातून फळे निघत नसतात. आपण जी बीजे पेरली त्यातून ती येणार आहेत. म्हणून जेव्हा शेवटी कडूनिंब हाती येताे, तेव्हा आपल्याला दु:ख हाेते, पश्चात्ताप हाेताे. आपण म्हणता, ‘मी बीजे तर अमृताची पेरली हाेती, मग त्याला ही कडू फळे कशी काय आलीत?’ लक्षात असू द्या फळ हीच कसाेटी आहे, हीच परीक्षा आहे-बीजाची. आपण काेणते बीज पेरले हाेते, ते फळच सांगून टाकते. आपण पेरताना कल्पना काय केली हाेती, याच्याशी बीजाचा काय संबंध? आपणा सगळ्यांना जीवनात आनंद पाहिजे असताे.पण मिळताे कुठे ताे आनंद? आपणा सगळ्यांनाच जीवनात शांती पाहिजे असते, पण कुठे येते ती शांती? आपणा सगळ्यांनाच पाहिजे असताे सुख, समृद्धी यांचा वर्षाव. पण हा वर्षाव कधी हाेतच नाही.