ओशाे - गीता-दर्शन

    15-Jul-2025
Total Views |
 
 

Osho 
मी फक्त इंद्रियांचा जाेड आहे असे ज्याला वाटते ताे इंद्रियाच्या आसक्तीतून मुक्त हाेईल काय? मी फक्त इंद्रियांचा जाेड असेन तर इंद्रियासक्तीतून मुक्त हाेणे म्हणजे केवळ आत्मघात, बाकी काही नाही. मी मरून जाईन, बाकी काही एक हाेणार नाही. पण कृष्ण तर म्हणताे की जाे इंद्रियासक्तीच्या पार गेला ताे याेगारूढ झाला.ताे म्हणताे की ताे मरणार तर नाहीच, उलट त्याला पूर्ण अर्थाने जीवन मिळेल. पण आपल्याला त्या जीवनाचा काहीच पत्ता नाही. इंद्रियमेळा हेच तर आपल्या जीवनाचे सर्वस्व आहे.आपल्याइंद्रियांचे अनुभव जर एक एक करून छाटून टाकले, तर खाली फक्त शून्य उरेल.म्हणजे काहीही उरणार नाही. हाती काहीही येणार नाही.
सगळा मेळा विस्कळित हाेऊन जाईल. तर मग आपणास इंद्रियासक्तीतून कसे सुटता येईल? इंद्रियासक्तीतून सुटण्यासाठी पहिले सूत्र समजून घेतले तरच सुटू शकाल.पाहिजे तर चेतना पदार्थाकडे आसक्त हाेऊ शकते.
 
जेव्हा एखादे इंद्रिय मागणी करते, जेव्हा एखादे इंद्रिय कुठलीही निवड करते, जेव्हा एखादे इंद्रिय तृप्तीसाठी आतुर हाेऊन धावते तेव्हाच, आपण हे इंद्रिय नाही आहाेत, या सत्याची ओळख हाेण्यासाठी काहीतरी करावे लागेल. जेव्हा आपण जेवण करता तेव्हा आपण इंद्रियचं हाेऊन जाता. त्यावेळी थाेडीशी जेवणाची आठवण ठेवली पाहिजे. खराेखरीच मी जेवण करताे काय? जेवत असताना आपण एकवेळ चमकून हे पाहिले पाहिजे की मी जेवत आहे काय? आत असा शाेध घ्यायला पाहिजे की मी जेवत आहे काय? जसजसा शाेध घ्याल तसतसा एक फरक आपल्या लक्षात येईल. आपण जेवण करीतच नाही आहात, आपण जेवणापासून खूप लांब आहात.शरीर जेवण घेते आहे. जेवण तर आपणाला स्पर्शही करत नाही. काेणताही पदार्थ चेतनेला स्पर्श करील तरी कसा? पण चेतना मात्र पाहिजे असेल तर पदार्थाकडे आसक्त हाेऊ शकते. पदार्थ तर शिवतही नाही पण पाहिजे तर चेतना मात्र पदार्थाकडे आकर्षित हाेऊ शकते. चेतना पाहिजे तर, स्वत: पदार्थाबाबत बंधनात असल्याचा अनुभव घेऊ शकते.