इकडच्या घाटावरून उतरणारे त्या घाटावरून कसे उतरू शकतील बरे? अन् तिकडचे लाेक या घाटावरून कसे उतरू शकतील? तेव्हा महावीर एवढेच म्हणतात, घाट काेणताही असू द्या, गंगेत, सत्याच्या गंगेत, अस्तित्वाच्या गंगेत एकदा उतरा म्हणजे झाले. म्हणून तर ते सगळ्यांनाच ठीक म्हणतात. मग महावीर चूक कशाला म्हणतात? जेव्हा काेणी म्हणताे की एक अमुक हाच घाट बराेबर आहे, बाकी सर्व घाट चुकीचे आहेत, असे जे म्हणणे आहे ते चुकीचे आहे. बाकी काहीएक चूक नाही. घाट बराेबर आहेत. फक्त दावा चुकीचा आहे. त्या घाटाने पण जाता येते हे रास्त आहे, पण त्याच घाटाने जाता येते हा दावा चुकीचा आहे. महावीर म्हणतात की फक्त एवढेच म्हणाना - याही घाटाने जाता येते. असे म्हणू नका की या एकाच घाटाने जाता येते. दुसऱ्या घाटाचा इन्कार केला ‘याच घाटाने’ म्हटले की हिंसा आलीच म्हणून समजा.
अन् सगळेच घाट खूप छाेटेसेच नाहीत का - गंगेच्या तुलनेने. गंगा खूप माेठी आहे. पूर्ण गंगेवर घाट बनविणेही ार अवघड आहे. पण सर्व धर्म हाच प्रयत्न करतात की - सगळ्या गंगेवर माझेच घाट असावेत असा. असे घाट हाेऊ शकत नाहीत, हा भाग निराळा.
इकडे घाट बनताेय, ताेवर तिकडे गंगेचे पात्रच बदलून जाते. गंगा विशाल आहे. अस्तित्वाची गंगा विराट आहे.आपण एखाद्या काेपऱ्यात घाट बनवू शकलाे तरी खूप झाले असेच समजा. याने आपल्याला सूर मारता आला तरी पुष्कळ झाले. मूलत: तीन वेगवेगळ्या प्रकारचे घाट आहेत - भावनाप्रधानांसाठी, विचारप्रधानांसाठी अन् वासनाप्रधानांसाठी.