नवविधा भक्तिमार्गातील नववी भक्ती आत्मनिवेदन ही हाेय. भक्तीचा हा सर्वांत उच्च काेटीचा मार्ग मानला जाताे. निवेदन म्हणजे अर्पण करणे हाेय आणि आत्मनिवेदन म्हणजे ‘मी’चे भगवंताच्या चरणी अर्पण हाेणे. त्याच्या ठायी विलीन हाेऊन जाणे हाेय. श्रीसमर्थ म्हणतात की, स्वत:ला देवाला वाहणे म्हणजे निवेदन हाेय. आपण देवाला जेव्हा ुले वाहताे, गंध, अक्षता वाहताे तेव्हा वाहिल्या जाणाऱ्या त्या पूजेच्या वस्तूंपासून वाहणारे आपण वेगळे असताे. पण जेव्हा आपण स्वत:लाच पूर्ण शरणागत हाेऊन देवाला वाहताे तेव्हा वाहणारा ‘मी’ आणि वाहिला जाणारा ‘मी’ हे दाेन्ही वेगळेपणाने उरतच नाहीत. आपले वाहण्याच्या कर्मातीलकर्तेपण लाेप पावते. त्यामुळे परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप हाेण्याचीच ही अवस्था असते.
आपण सामान्य प्रपंची माणसे आपले शरीर किंवा देह म्हणजेच ‘मी’ आहे असे धरून चालताे व खरा मी म्हणजे त्या शरीरात वसलेला निरंजन आत्मा आहे, त्याला मात्र विसरून जाताे. अर्थात असे देहतादात्म्यक असलेल्या माणसाच्या मनातही आत्म्याचे ज्ञान तसे सूक्ष्मरूपाने सदैव असतेच; पण तरीही बाह्य जगाच्या सतत सहवासामुळे ताे देह म्हणजेच ‘मी’ ही खाेटी समजूत बाळगताे. त्या समजुतीचे व सत्य स्थितीचे अतिशय समर्पक उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की, एखाद्याच्या अंगणातले झाड पडले तर आपण त्याचे झाड पडले असे म्हणताे. पण जर ताे मरण पावला तर त्याचा देह गेला असे म्हणत नाही तर ताे गेला असे म्हणताे. खरे तर त्याचा अचेतन देह तसाच असताे फक्त त्यातील चेतनास्वरूप आत्मा निघून गेलेला असताे.