ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवर भावार्थमय असा भाष्यग्रंथ आहे. ही भगवद्गीता महाभारतात तत्त्वज्ञान सांगणारी म्हणून प्रसिद्ध आहे. या भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरांनी स्वतंत्र गाैरव तर केला आहेच, पण ही गीता ज्या महाभारतात आहे त्या थाेर ग्रंथाची स्तुतीही त्यांनी मनापासून केली आहे. ज्ञानेश्वरांच्या मताने महाभारत हे सर्व काव्यांचा राजा आहे. सर्व ग्रंथाचे श्रेष्ठत्व या ग्रंथात एकवटलेले आहे. सर्व रसांची उत्पत्ती याच महाभारतातून झालेली आहे. ज्ञानेश्वरांच्या मते सर्व जगातील कथांचे जन्मस्थान म्हणजे महाभारत हाेय.ही महाभारतकथा म्हणजे विवेकतरूंचे अभिनव उद्यान आहे. हे सर्व सुखांचे मूळ आहे. जाणण्यास याेग्य अशा विविध प्रकारांच्या सिद्धांतांचा हा साठा आहे. किंवा महाभारत म्हणजे नवरसांनी भरलेला एक माेठा सागरच आहे. यातील कथा म्हणजे उघड उघड परमगती आहे. ही भारतकथा सर्व विद्यांचे जन्मस्थान आहे.
सर्व शास्त्रांचे वसतिस्थान आहे किंवा असे म्हणता येईल की, महाभारत म्हणजे सर्व धर्मांचे माहेर आहे. महाभारताचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेची झेप उंचावलेली आहे. त्यांच्या मते महाभारत म्हणजे सत्पुरुषांच्या अंत:करणातील जिव्हाळा आहे.ते सरस्वतीच्या साैंदर्याचे काेठारच आहे.अशी ही महाभारतकथा व्यासांच्या विशाल बुद्धीतून सर्व सृष्टीत प्रकट झालेली सरस्वती नदीच हाेय. म्हणूनच कथारूपी भारत हा सर्व काव्यग्रंथांचा राजा असल्याचे ज्ञानेश्वरमहाराज सांगतात.या महाभारत ग्रंथापासूनच ज्ञानेश्वरांच्या मते साैंदर्याला शास्त्रीय बैठक मिळाली. परब्रह्मबाेधाची रुक्षता जाऊन त्याला जाे मृदुपणा आला ताे या महाभारतामुळेच. येथेच चातुर्याला शहाणपण आले.ब्रह्मसिद्धांतास रुची आली. सुखाचे साैभाग्य परिपुष्ट झाले. गाेडीला गाेडी आली. शृंगाराला सुरेखपणा, कलांना नैपुण्य यांची प्राप्ती झाली