केळी आणि कापूस उत्पादनात अग्रस्थानी जळगाव जिल्ह्याची आणखी एक खासियत म्हणजे भरीताची वांगी.आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या वांग्यांना भाैगाेलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृत वापरकर्ता म्हणून याची नाेंदणीही केली आहे.राज्याच्या फलाेत्पादन विभागाच्या प्रयत्नांमुळे सुमारे 40 कृषी उत्पादनांना आतापर्यंत भाैगाेलिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात उत्पादित हाेणाऱ्या भरीत वांग्यानाही स्थान मिळाले आहे. कवयित्री बहिणाबाई चाैधरी यांचे माहेर असलेल्या आसाेदा (ता.जळगाव) येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाने त्यासाठी 2016 मध्ये पुढाकार घेतला हाेता.
भाैगाेलिक मानांकन प्राप्त झाल्यानंतर भरीत वांग्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माची संपूर्ण जगाला ओळख करून देत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यातीत माेठी झेप घेण्याचा निर्धार सर्व शेतकऱ्यांनी केला आहे.भाैगाेलिक मानांकन मिळाल्यानंतर नियमित भरीत वांगी लागवड करणाऱ्या 20 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातूनअधिकृत वापरकर्ता नाेंदणीची प्रक्रियाही पार पाडली हाेती. काेणत्याही कृषी उत्पादनांना भाैगाेलिक मानांकन प्राप्त झाल्यानंतर वापरकर्ता शेतकरी संबंधित शेतमालाच्या ब्रँडिंगसाठी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेळाव्यांसह कृषी प्रदर्शनांत सहभागी हाेऊ शकतात.
त्यासाठी शासनाच्या पणन विभागाकडून त्यांना खास प्राेत्साहनपर अनुदान देण्यात येते.गडद हिरवा रंग, वजनाला हलके, आतमध्ये बियांचे प्रमाण कमी आणि काेवळी लुसलुशीत असणारी आसाेद्यातील वांगी भाजल्यानंतर नैसर्गिक तेल त्यात उतरते. भरीत तयार केल्यानंतरचा स्वाद जिभेवर रेंगाळत राहताे. संबंधित शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून भरीत वांग्यांचे दर्जेदार बियाणे जतन केले आहे.
त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत भरीत वांग्यांच्या खरेदीसाठी अनेक ग्राहक थेट शेतात जातात. मात्र, हल्ली बाजारात संकरित वांग्यांची आवक वाढल्याने आसाेद्यातील देशी वांग्यांच्या लाेकप्रियतेत थाेडी घट झाली आहे.