श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला संकष्टी चतुर्थीनिमित्त हरित संदेश देणारी अनाेखी आरास साकारण्यात आली हाेती. 21 प्रकारच्या ताज्या व आकर्षक पालेभाज्यांचा नैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला. पहाटे स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केल्यानंतर बाप्पाला महाअभिषेक आणि गणेशयाग अशा विविध कार्यक्रमांचे आयाेजन मंदिरात करण्यात आले हाेते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. सकाळी डाॅ. सुनील काळे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित हाेते. गायिका कृपा किरण नाईक व सहकाऱ्यांनी पहाटे स्वराभिषेक सादर केला.मेथी, काेथिंबीर, शेपू, करडई, चवळई, बीट, लाल माठ, लाल व पांढरा मुळा, अंबाडी, पुदिना, कांदापात, कडिपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा अशा विविध भाज्या मांडण्यात आल्या हाेत्या. 2 हजार गड्ड्यांमधून साकारलेली ही आरास पाहण्यासाठी व बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली हाेती. शेतकरी सुखी राहाे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.