सांगलीतील एमआयडीसी क्षेत्रातील वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेऊन त्यावर नियंत्रणासाठी अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणेबाबत तात्काळ आराखडा बनवून जिल्हा नियाेजन समितीच्या मान्यतेसाठी सादर करावा, अशा सूचना सांगलीचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. पाेलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या बैठकीस पाेलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, पालक मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, पाेलीस निरीक्षक सर्वश्री सतीश शिंदे, संजीव झाडे, विशाल टकले आणि संजय माेरे आदी उपस्थित हाेते. नागरिकांच्या सुरक्षेस पाेलीस प्रशासनाने प्राधान्य द्यावे. गुन्हेगारांवर नियंत्रणासाठी पाेलीस प्रशासनाने आवश्यक तेथे कठाेर पावले उचलावीत. एमआयडीसी क्षेत्रातील वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेऊन त्यावर नियंत्रणासाठी अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणेबाबतचा तात्काळ आराखडा बनवून जिल्हा नियाेजन समितीच्या मान्यतेसाठी सादर करावा, असे पाटील यांनी सांगितले. पाेलीस अधीक्षक घुगे यांनी जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सादरीकरण केले.