तैसें एक पार्था। तुज आभार नाहीं सर्वथा।। आम्ही आपुलियाचि स्वार्था। बाेलाें पुढती ।। 10.57

    04-Dec-2025
Total Views |
 

saint 
 
सर्वसामान्य लाेकांच्या प्राकृत म्हणजे मराठी भाषेबद्दल ज्ञानेश्वरांना केवढे प्रेम आहे हे या आणखी एका ओवीत प्रकट झाले आहे. ज्ञानेश्वरांच्या पूर्वी सर्व ब्रह्मविद्या संस्कृत भाषेमध्ये असून ती देवभाषा म्हणून प्रसिद्ध हाेती. ही ब्रह्मविद्या यावेळी ज्ञानेश्वरांनी मराठीत आणण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांना प्रस्थापित सनातनी पंडितांचा विराेध झाला. हा विराेध पुढे तुकारामांपर्यंत टिकला.तुकारामांच्या आधी विराेधकांना उद्देशून एकनाथांनी म्हटले की, ‘संस्कृत वाणी देवें केलीŸ। प्राकृत काय चाेरांपासूनि आली?’ संस्कृत व प्राकृत या दाेन्ही भाषा एकाच मूलतत्त्वापासून प्रकट झाल्यामुळे प्राकृतात ब्रह्मविद्या सांगण्यास काेणतीच हरकत नसावी असे ज्ञानेश्वरांनी सिद्ध केले आहे. संस्कृत भाषा ही कठीण असल्यामुळे सर्वसामान्य माणसांना अनाकलनीय वाटली.
 
तीमधील ब्रह्मज्ञान त्यांच्यापर्यंत पाेहाेचलेच नाही आणि सर्व मानवजात ही एकाच प्रभूची लेकरे असल्यामुळे सर्वांना ब्रह्मज्ञानाचा लाभ हाेणे अगत्याचे आहे आणि हा लाभ लाेकभाषेत व्हावयास हवा.ज्ञानेश्वरांनंतरच्या एका सत्पुरूषाने म्हणजे कबीराने म्हटले आहे की, ‘संस्कृत भाषा कूपजलŸ। कबीर बहता नीरŸ।’ कबीराची प्राकृतवाणी ही वाहत्या पाण्याप्रमाणे जिवंत व प्रवाही आहे. या अशा प्रभावी भाषेत आता आपण उरलेली कथा चातुर्याने व रसाळपणे सांगू असे सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात की, शांतरस शृंगाराला जिंकेल व ओव्या अलंकारशास्त्राला भूषण हाेतील. भूषणाने शरीराला शाेभा आणली की शरीराने भूषणास शाेभा आणली याची निवड कशी करायची? त्याप्रमाणे संस्कृत व मराठी भाषा तितक्याच महत्त्वाच्या आहेत, असे तुम्ही जाणावे.