विविध उपाययाेजनांमुळे 26 नाेव्हेंबरपासून मुंबईच्या हवेत सातत्याने सुधारणा हाेत असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने ग्रेडेड रिस्पाॅन्स अॅक्शन प्लॅन स्टेज-4 (ग्रॅप-4) मुंबईसाठी सध्या लागू नसल्याचे स्पष्ट केले.मात्र, प्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेकडून मुंबईतील 482 बांधकामांना कारणे दाखवा आणि 264 बांधकामांना काम थांबवा नाेटीस बजावण्यात आली आहे.वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) सुधारणेसाठी महापालिकेच्या प्रत्येक वाॅर्डातील विशेष भरारी पथकांकडून बांधकामांची तपासणी हाेत असून, प्रदूषणात भर घालणाऱ्या विकासकांना नाेटिसा बजावल्या जात आहेत. महापालिकेने जारी केलेल्या 28 मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकाेरपणे पालन करण्यावर भर दिला जात आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी, शासकीय, अशासकीय प्रकल्पांवर यापुढेही कारवाई सुरूच ठेवावी, असे निर्देश आयु्नत भूषण गगराणी यांनी दिले आहेत; तसेच ग्रेडेड रिस्पाॅन्स अॅक्शन प्लॅन स्टेज-4 मुंबईसाठी सध्या लागू नाही.मात्र, एक्यूआयचे सातत्याने माॅनिटरिंग करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आयु्नतांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईच्या हवेत सातत्याने नायट्राेजन आणि कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर या कारणामुळे प्रदूषणात सर्वाधिक भर पडत असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाने दिली आहे.