डेहराडूनमध्ये झालेल्या 28व्या अखिल भारतीय वन क्रीडा संमेलनात महाराष्ट्र वन विभागाने 31 सुवर्ण, 26 राैप्य आणि 20 कांस्य अशी एकूण 77 पदके जिंकत 286 गुणांसह देशात चाैथे स्थान पटकावले; तसेच राज्यातील 13 क्रीडापटूंनी विविध स्पर्धांत चाैथे स्थान मिळवले आहे.गतवर्षी रायपूरमध्ये झालेल्या 27व्या अखिल भारतीय वन क्रीडा संमेलनात राज्याने आठवे स्थान पटकावले हाेते. यंदा विभागाने थेट चाैथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या यशात राज्यातील 4 वन प्रशिक्षण संस्था आणि 2 वन अकादमींतील प्रशिक्षणार्थ्यांचा माेठा वाटा असून, त्यांनी मिळवलेल्या 27 पदकांमुळे महाराष्ट्राच्या पदकांत वाढ झाली.
धावणे, लांबपल्ला, रिले, मॅरेथाॅन, लांबउडी, रेस वाॅक, भालाफेक, वेट लिफ्टिंग आणि पाॅवर लिफ्टिंग अशा विविध प्रकारांत प्रशिक्षणार्थ्यांनी 9 सुवर्ण, 10 राैप्य आणि 8 कांस्य पदके पटकावली.चंद्रपूर वन अकादमीने सर्वाधिक 10 पदके जिकून आघाडी घेतली. शहापूर वन अकादमीने 6 पदके जिंकत दुसरा क्रमांक पटकावला. चिखलदरा वन अकादमीने सातत्यपूर्ण कामगिरी करत 7 पदके पटकावली. जालना अकादमीने 3 राैप्य पदके पटकावली. महाराष्ट्र वन विभाग शिक्षण आणि प्रशिक्षण शाखेने सर्व विजेते खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांचे अभिनंदन केले आहे.