बेकरी, केक शाॅप्स, हाॅटेलची कसून तपासणी हाेणार

    04-Dec-2025
Total Views |
 
 

food 
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताला गालबाेट लागू नये यासाठी बेकरी, केक शाॅप्स आणि दुकानांच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विशेष माेहीम हाती घेणार आहे. या माेहिमेत हाॅटेल्स, केक शाॅप्स, फास्ट फूड आणि भाेजनालयांमधील अन्नपदार्थांची तपासणी करण्यात येईल. बार आणि रेस्टाॅरंटमधील खाद्यपदार्थांच्या तपासणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत छापे टाकण्यात येणार असल्याचे एफडीएने जाहीर केले आहे.त्यासाठी विशेष तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत.नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांकडून माेठ्या प्रमाणात केक व बेकरी पदार्थांना प्राधान्य दिले जाते; तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला नागरिक माेठ्या संख्येने बाहेर पडतात.या दिवशी हाॅटेल्स, बार, रेस्टाॅरंट्स, फास्टफूडच्या निरनिराळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी हाेते.
 
वाढती मागणी लक्षात घेता बेकरी, हाॅटेल्स आणि फास्टफूड विक्री करणाऱ्यांकडून खाद्यपदार्थांमध्ये भेसळीची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांना निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ मिळण्याची शक्यता असते.ही बाब लक्षात घेऊन एफडीएने या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे परवाने आहेत का, कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल, अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल, आस्थापनांची एकूण स्वच्छता, अन्नपदार्थांचा पुनर्वापर, अन्नाची गुणवत्ता, पॅकेजिंग आदींची तपासणी करण्यात येईल.याशिवाय विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पनीर, बटर, चिकन, मटण आदी नाशवंत वस्तूंची गुणवत्ता एफडीएचे अधिकारी तपासणार आहेत.
 
एफडीएचे पथक 31 डिसेंबरपर्यंत विविध आस्थापनांवर अचानक छापे टाकणार आहे. त्यात आस्थापनांची कसून तपासणी करण्यासाठी विशेष पथके सज्ज करण्यात आली आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
या तपासणीत अन्नाचे नमुने आवश्यक ती मानके पूर्ण करत नसतील तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.नाेंदणी प्रमाणपत्रे असलेल्या विक्रेत्यांना चक्रवाढ दंड आकारला जाणार आहे.तसेच खाद्यपदार्थांसंदर्भातील मानके पूर्ण न करणाऱ्या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात येणार आहेत. काेणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत काेणतीही तक्रार असल्यास त्याबाबत टाेल फ्री क्रमांक 1800-222-365 वर सविस्तर माहिती नाेंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयु्नत (अन्न) मंगेश माने यांनी केले.