भारत-श्रीलंका मॅच. वीरेंद्र सेहवाग तुफान फाॅर्ममध्ये हाेता. त्याने कसाेटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी 284 धावा केल्या. राहुल द्रविडबराेबर त्याची जाेरदार पार्टनरशिप झाली हाेती. पहिला दिवस संपायला थाेडा वेळ हाेता. द्रविडने वीरूला सल्ला दिला, तू आता दिवसभरात थकला आहेस. लाइट लाे झालेला आहे. आता काही चूक केलीस तर त्रिशतकाला मुकशील. त्यापेक्षा आज सावध खेळ. दिवस संपवू या. उद्या मस्त विश्रांती घेऊन, ताजातवाना हाेऊन परत मैदानात आलास की पुन्हा तडाखेबाज खेळशील. त्रिशतक हाेईल, तुझा फाॅर्म पाहता कदाचित चाैशतकही मारू शकशील. कधी नव्हे ताे वीरूने कुणाचा सल्ला ऐकला. दिवसाचा खेळ संपेपर्यंतच्या ओव्हर्समध्ये द्रविड पहिले काही बाॅल खेळून काढायचा, शेवटच्या बाॅलवर रन घेऊन पलीकडे जायचा. वीरूला कमीत कमी बाॅलचा सामना करावा लागेल, अशी ती रणनीती हाेती. दुसरा दिवस उजाडला. विश्रांती घेऊन ताजातवाना झालेला वीरू खेळायला आला. येताच त्याने धडाका लावला. पण, अवघ्या नऊ धावांची भर घातल्यानंतर एक घातक फटका खेळून ताे 293वर आऊट झाला. पॅव्हिलियनमध्ये जातानाची त्याची मुद्रा पाहा. झक मारली आणि द्रविडचं ऐकलं. मी माझ्या पद्धतीने खेळलाे असताे, तर कालच माझं तिसरं त्रिशतक झालं असतं, असा पश्चात्ताप व्यक्त करताेय ताे.