मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक काेंडीवर उतारा म्हणून जलवाहतुकीचा पर्याय येत्या काळात उपलब्ध हाेणार आहे.
त्यानुसार महाराष्ट्र सागरी मंडळाकडून मुंबई महानगर प्रदेशात 200 कि.मी.हून अधिकचे नवीन जलवाहतुकीच्या मार्गाचे जाळे विणले जात आहे.त्यात 10 मार्गांचा समावेश असून, डिसेंबरअखेरपर्यंत आराखडा पूर्ण हाेईल. या दहा मार्गांमध्ये नवी मुंबई विमानतळ ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गाचाही समावेश असून, तेथून वाॅटर टॅक्सी धावणार आहेत. 18 कि.मी.च्या या मार्गामुळे वाॅटर टॅक्सीने नवी मुंबई विमानतळ ते गेट वे ऑफ इंडिया अंतर 45 मिनिटांत पार करता येणार आहे.सध्या 21 जलवाहतूक मार्ग सेवेत असून, त्यातील 12 मार्ग एमएमआरमधील आहेत. जलवाहतूक मार्गांचा अधिक विस्तार करण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला आहे.त्यानुसार नवीन 10 जलवाहतूक मार्ग सेवेत दाखल करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे.
नवीन मार्गांवर प्रवासी बाेटी, राे-राे सेवा आणि वाॅटर टॅक्सी धावणार आहेत.डिसेंबरअखेरपर्यंत आराखडा तयार हाेईल, अशी माहिती सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी.यांनी दिली.मुंबईतून नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, भाईंदर आणि अन्य ठिकाणी जलवाहतूक मार्गाने पाेहाेचता यावे, यासाठी नवीन 10 जलवाहतूक मार्गांची आखणी केली जात आहे.त्यात वसई ते काल्हेर, कल्याण- मुंब्रा-काल्हेर-काेलशेत, काल्हेर ते नवी मुंबई विमानतळ, वाशी ते नवी मुंबई विमानतळ, गेट वे ते नवी मुंबई विमानतळ, वसई ते मार्वे अशा काही मार्गांचा समावेश आहे. एकूण 200 कि.मी.हून अधिकच्या जलवाहतूक मार्गांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. या कामासाठी अंदाजे 2500 काेटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे.