वसईत नाताळच्या आगमनाला जांभळी मेणबत्ती लावून सुरुवात

    03-Dec-2025
Total Views |
 
 

vasai 
दिवाळी संपताच वसई-विरारमध्ये खासकरून ख्रिस्ती बांधवांकडून सुरुवात हाेते ती नाताळच्या तयारीची. नाताळ सण खऱ्या अर्थाने सुरू हाेताे ताे नाताळ सुरू हाेण्याआधी येणाऱ्या पहिल्या चार रविवारपासून. चार रविवारी वेगवेगळ्या रंगांच्या मेणबत्त्या लावून विधी साजरे केले जातात. त्यानुसार पहिल्या रविवारी जांभळ्या रंगाची मेणबत्ती लावून नाताळ सणाच्या आगमनाची तयारी सुरू करण्यात आली. वसई, पालघर, ठाणे, मिरा-भाईंदर या किनारपट्टी भागात माेठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव राहतात. त्यामुळे ईस्टर, गुड फ्रायडे आणि नाताळ असे सण वसई- विरार आणि मिरा-भाईंदरमध्ये माेठ्या उत्साहात साजरे केले जातात. नाताळ सणाला खरी सुरुवात हाेते, ती नाताळच्या चार आठवडे आधी. त्यानुसार 30 नाेव्हेंबरपासून या सणाला सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील सर्व चर्चमध्ये आनंदाचे वातावरण हाेते. धार्मिक विधीसाठी ख्रिस्ती बांधव एकत्र आले हाेते. वसई-विरारमधील चर्चमध्ये खासकरून मुलांच्या हस्ते मेणबत्त्या लावून आगमन काळाचे उद्घाटन करण्यात आले. या आठवड्यात मुलांसाठी विशेष प्रार्थना केली जाईल, असे भुईगाव चर्चचे फादर विजयकुमार लाेपीस यांनी सांगितले.