ओशाे - गीता-दर्शन

    03-Dec-2025
Total Views |
 


Osho
जाे म्हणताे की, मला हे जीवन स्वप्नासारखं आहे. सत्य नाहीये. हे जीवन म्हणजे एक रंगमंच आहे. आणि मी इथे नाटक खेळताेय. काही काम वगैरे करत नाही. असं ताे म्हणताे, जाे जीवनाकडे कमी प्रमाणात का हाेईना गंभीरपणे पाहताे आणि म्हणताे, ‘हे काम मला करायचंय.’ ताे मित्र-शत्रूंच्या बाबतीत समभाव बाळगूच शकत नाही. कारण त्याच्या त्या कामामुळेच शत्रूंबद्दल आणि मित्रांबद्दल वेगवेगळे भाव ठेवणे त्याला भाग पडत असते. या पृथ्वीच्या पाठीवर मला जर काही काम करायचं असलं. मला काही करायचं आहे, साधायचं आहे अशी भूमिका असली तर मी मित्र-शत्रूंच्या बाबतीत समभाव अजिबात बाळगू शकणार नाही.
 
या पृथ्वीवर माझं काहीही काम नसेल तेव्हाच मित्र-शत्रूंच्या बाबतीत माझा समभाव हाेऊ शकताे.मला कुठं पाेहाेचायचं नाहीये. काही करून दाखविण्याचा हव्यास मला नाहीये. याचा असा अर्थही नाहीये की मी अगदी काही न करता गुपचूप निष्क्रिय बसावं म्हणजे मी मित्र-शत्रूंच्या बाबतीत आपाेआपच समभावाला उपलब्ध हाेईन. जर मी असं रिकामटेकडं बसायचं ठरवलं तर काही त्यात मदत करणारे माझे मित्र हाेतील अन् काही शत्रू हाेतील. जे माझ्याबाबत अडथळा आणतील.नाही याचा हा अर्थ नव्हेच. याचा अर्थ एवढाच की, काम तर मी करीत राहीनच, पण अमुक एक काम करून दाखवायचंच हा अहंकार, ही जिद्द ठेवायची नाही.म्हणजे मग, जाे मदत करील त्यालाही धन्यवाद. अन् जाे अडथळे आणील त्यालाही धन्यवाद.