सतर्कतेने संभाव्य दुर्घटना टाळणाऱ्या, प्रसंगावधान राखून प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या 11 कर्मचाऱ्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी केलेल्या अनुकरणीय कामगिरीबद्दल या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. मुंबई सेंट्रल विभागातील फिटर सुदाम पाटील कर्तव्यावर असताना नियमित तपासणीदरम्यान ब्रेक व्हॅनचा सेंटर पिव्हाेट तुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. तपासणीनंतर ती वॅगन पुढील प्रवासासाठी अयाेग्य घाेषित करण्यात आली.
त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.मालगाडीचे ब्रेक पाॅवर सर्टिफिकेट अवैध असल्याचे लाेकाे व्यवस्थापक राकेश घाेडीचाेर यांनी मालगाडीचा ताबा घेताना पाहिले. वॅगनच्या मागील कंटेनरचे कुलूप लाॅकच्या छिद्रांमधून बाहेर आल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी खात्री करण्यासाठी संपूर्ण मालगाडीची तपासणी केली आणि वसई राेड येथील उप स्थानक अधीक्षकांना या त्रुटींची माहिती दिली. राकेश यांच्या ही समस्या लक्षात आली नसती, तर माेठी दुर्घटना घडली असती. त्यांच्या या कृतीबाबत महाव्यवस्थापक गुप्ता यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधान आणि सतर्कतेचे काैतुक केले.