वसईत नाताळ सणाच्या आनंदाेत्सवास कॅरल सिंगिंगद्वारे उत्साहात सुरुवात झाली

    25-Dec-2025
Total Views |
 
 

vasai 
प्रभू येशूचे आगमन हाेणार आहे, तयारीला लागा...असा शुभसंदेश देत येशूच्या गाैरव गीतांतून कॅरल सिंगिंगचे स्वर वसईत निनादू लागले आहेत. तरुणांची पथके बॅण्ड आणि संगीताच्या तालावर गीते गात आहेत. गुलाबी थंडीबराेबर वसईत आनंदाेत्सवाला सुरुवात झाली आहे. वसई-विरारच्या पश्चिम पट्ट्यातील विविध गावांत ख्रिस्ती बांधव माेठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे फार पूर्वीपासून शहरात माेठ्या उत्साहात नाताळ साजरा केला जाताे. नाताळपूर्वी कॅरल सिंगिगचे सूर वसईत घुमू लागले आहेत. रंगरंगाेटी, साफसफाई, कँडल स्टॅँड सफाई अशा वेगवेगळ्या कामांना वेग आला आहे. संपूर्ण जगभरात स्थानिक भाषेतून ही नाताळ गाणी गायली जातात. वसईतील सर्व प्रार्थना, गीते मराठीत गायली जात आहेत. फादर हिलेरी फर्नांडिस आणि फादर डायगाे परेरा यांनी अनेक रचना मराठीत रचल्या. मग मराठीत कॅरल सिंगिंगची सुरुवात झाली. वसईत सुमारे 15 ते 20 फिरती कॅरल सिंगिग पथके आहेत. उत्तर वसई, दक्षिण वसई, माणिकपूर, चुळणे आदी ठिकाणी स्वतंत्र पथके सध्या कॅरल सिंगिगद्वारे नाताळ सणाच्या आमगमनाची वर्दी देत आहेत.