बकासुर, गज्या, पावर, अधिरा, माणिक, प्रधान, करंट ही नावं तुमच्या माहितीची आहेत का? यातला बकासुर हिंद केसरी, सातारा केसरी, रुस्तम ए हिंद अशा किताबांचा मानकरी आहे. हे सगळे बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन सन्मान पटकावणारे बैल आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये बैलगाडा शर्यतींची प्रचंड माेठी क्रेझ आहे. या भागांमधून प्रवास करताना, ‘एकच नाद, बैलगाडा शर्यत’ असं स्टिकर लावलेल्या कितीतरी कार, एसयूव्ही आणि माेटरसायकलीही दिसतात. एखाद्या बैलाचं निधन झालं तर साेशल मीडियावर एखाद्या पुढाऱ्याच्या निधनानंतर पडाव्यात तशा प्रकारे श्रद्धांजली वाहणाऱ्या पाेस्टींचा पूर येताे.
या बैलांना सांभाळणं, वाढवणं हे खर्चिक काम आहे.सगळा हाैसेचा मामला आहे. त्यांना सर्व प्रकारच्या साेयीसुविधा, उत्तम प्रतीचं खाद्य, हे सगळं उपलब्ध करून दिलं जातं. एकेकाळी सरपंच या नावाने ओळखला बकासुर हा असंख्य स्पर्धा जिंकणारा बैल विकण्याचा विचार मालक कधीच करणार नाहीत. पण, ताे बाजारात आला तर त्याची किंमत साडेतीन काेटी रुपये असेल आणि तेवढी माेजायला तयार असलेले बैलगाडा शर्यतीचे दहावीस शाैकीन थैल्या घेऊन उभे असतील.या बैलांचे खास कुशल ड्रायव्हर असतात. घाेडा आणि जाॅकी यांच्यात जसं नातं असतं, तसं ड्रायव्हर आणि बैल यांच्यातही असतं.