हा प्रसिद्ध फाेटाे अनेक सुविचारांमध्ये वापरला जाताे. इथला माणूस समुद्रकिनाऱ्यावर खिळे ठाेकून त्याची मर्यादा निश्चित करताे आहे. आता हा विनाेदी प्रकार आहे. काेणतीही एक लाट दुसऱ्या लाटेसारखी येत नाही.एका लाटेच्या सीमेवर खिळे ठाेकले तर पुढची लाट त्या सीमा ओलांडून जाईल किंवा त्या सीमेच्या आतच मान टाकेल. भरती आणि ओहाेटीचा खेळ सतत सुरू असताे समुद्रात. अशावेळी माणसाने आपल्या मनाने त्याच्या मर्यादा ठरवणं हे मूर्खपणाचंच आहे. इथे या वेडगळपणाची तुलना मानवी अहंकाराशी केलेली आहे. माणसाचा अहंकार हेच काम करताे. ताेही असंच सगळं काही विशिष्ट कुंपणांच्या आड जपून ठेवू पाहताे. आज मला भरभरून प्रेम मिळालं आहे, ते मी आत भरून ठेवताे. आता माझ्याकडे खूप प्रसिद्धी आहे, ती साठवून ठेवताे. हा बक्कळ पैसा आलेला आहे, आता इतकाच येत राहिला पाहिजे, हे ठरवताे. आज माझ्याकडे अमाप सत्ता आहे, आता जगाच्या अंतापर्यंत मीच सत्ताधीश. या सगळ्या कल्पना समुद्राला बंधन घालणारे खिळे ठाेकण्यासारख्याच आहेत.कारण, पैसा, प्रसिद्धी, सत्ता, प्रेम आणि इतर अनेक गाेष्टी आल्या आणि कायम झाल्या असं हाेत नाही कुणाच्याच आयुष्यात. त्या येतात आणि जातात. टिकत काहीच नाही. हेच जीवनचक्र आहे.