स्वच्छ हवेसाठी महापालिकेची स्वच्छता माेहीम

    15-Dec-2025
Total Views |
 

nm 
 
शहरातील वाढते वायुप्रदूषण आणि धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने मुख्य रस्त्यांवरील सखाेल स्वच्छता माेहिमांना माेठ्या प्रमाणात गती दिली आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर धूळ झाडणे, पाण्याच्या टँकरद्वारे धुलाई आणि यांत्रिक पद्धतीने कचरा साफ करत सखाेल स्वच्छता माेहीम राबवली जात आहे. त्यासाेबतच आता महापालिकेकडून शहरातील अनेक महत्त्वाच्या चाैकांपासून ते महामार्गालगतच्या पट्ट्यांपर्यंत विभाग स्तरावर स्वच्छता माेहीम राबवण्यात येत आहे.शहरातील मुख्य रस्त्यांवरील स्वच्छता माेहिमांसाेबतच महापालिकेने बांधकाम साइट्सवरही आपले लक्ष केंद्रित केले आहे. बांधकामांदरम्यान माेठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने विविध प्रकल्पस्थळांची अधिकारी तपासणी करत आहेत. यादरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्या 86 बांधकाम साइट्सना महापालिकेने नाेटिसादिल्या आहेत. यानंतरही बांधकाम साइट्सवर प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास कठाेर कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
फूटपाथ किंवा सार्वजनिक मार्गांवर बांधकाम साहित्य टाकणे, ढिगारे खुल्या जागेत साठवणे; तसेच सुरक्षेसाठी जाळ्यांचा अभाव आढळलेल्या ठिकाणांवर कारवाईच्या सूचनाहीदेण्यात आल्या आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी साइट्सना धूळ नियंत्रणासाठी ग्रीन नेट, पाण्याची फवारणी आणि ट्राॅली वाहतुकीसाठी झाकलेले डंपर वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य रस्त्यांवरील प्रारंभिक माेहिमा पूर्णत्वाकडे जात असून, पुढील टप्प्यात विभागनिहाय स्वच्छता माेहीम अधिक जाेमाने राबवण्यात येईल. यासाठी विविध नाेडमधील प्रभाग कार्यालयांना स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.शहरातील अंतर्गत रस्ते, बाजारपेठ परिसर, बसथांबे, वसाहती आणि गर्दीच्या ठिकाणी वाढीव मनुष्यबळासह विशेष पथके तैनात करण्याची तयारी करण्यात आली असून, दिवसातून दाेन सत्रांत स्वच्छता माेहीम राबवत धूलीकणांचे प्रमाण कमी करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.