तिन्ही दलांच्या सामर्थ्यामुळे देशाची प्रगती : राज्यपालांचे प्रतिपादन

    15-Dec-2025
Total Views |
 

Governor 
 
देशात शांतीचे वातावरण असेल, तरच समाजाची प्रगती शक्य हाेते. आपल्या देशाची तिन्ही सैन्य दले सक्षम आहेत.त्यामुळेच आपले जवान व अधिकारी सर्वाेच्च सन्मानास पात्र आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयाेजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन माेहिमेचा प्रारंभ लाेकभवनात केला. ध्वज निधी संकलनासाठी उत्तम कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 
नाैदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन, लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाहा, एअर व्हाइस मार्शल प्रशांत वडाेदकर, सचिवपंकज कुमार, राज्यपालांचे सचिव डाॅ.प्रशांत नारनवरे, सैनिक कल्याण विभागाचे संचालक, कर्नल दीपक ठाेंगे (निवृत्त), मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव, विविध देणगीदार संस्था, शाळा, महापालिका, सरकारी विभाग आणि खासगी क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी व अधिकारी यावेळी उपस्थित हाेते.
 
जिल्हाधिकारी साैरभ कटियार म्हणाले, की सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त संकलित निधी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, लढाईत जखमी/अपंग झालेल्या जवानांचे पुनर्वसन, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणकारी याेजना, जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत, सैनिक कल्याण बाेर्डाच्या विविध उपक्रमांसाठी हा निधी वापरला जाताे.निधी संकलनासाठी याेगदान दिलेल्या सर्व सैनिक, सैनिकी कुटुंब, नागरिक, शाळा, संस्थांचे जिल्हाधिकारी अंचल गाेयल यांनी आभार मानले. यावेळी निधी संकलनासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांचा गाैरव करण्यात आला.