ओशाे - गीता-दर्शन

    12-Dec-2025
Total Views |
 

Osho 
 
असा माणूस मित्रालाही देऊन टाकील आणि शत्रूलाही. कारण, काही कमी पडणार नाहीये. शिवाय मित्र-शत्रू हा फरक तरी कसा करावा? जर दाेघांनाही द्यायचंच आहे तर फरक करण्याचा काय प्रश्न आहे? घ्यायचं असेल तर फरक करण्याचा प्रश्न उद्भवेल- ज्याच्याकडून मिळायचं ताे मित्र. ज्याच्याकडून नाही मिळायचं ताे शत्रू; पण फ्नत द्यायचंच असेल तर फरक काय म्हणून करायचा? तेव्हा हे तिसरं सूत्र लक्षात घ्या की, जे प्रेमाचे मालक हाेतात तेच फ्नत मित्र-शत्रू यांच्याविषयी समबुद्धीला उपलब्ध हाेऊ शकतात.
मी म्हटलं की धन-निर्धन याबद्दल समभाव आणणं फारसं अवघड नाहीये, का तर धन ही खूप बाह्य पातळीवरची घटना आहे. तीच गाेष्ट यशापयशाची.
 
याबद्दल समबुद्धी आणणं हीही फारशी माेठी गाेष्ट नाही, कारण यशापयश हा लाेकांच्या डाेळ्यांचा खेळ आहे.पण मित्र आणि शत्रू याबद्दल समभाव आणणं ही फार खाेलवरची घटना आहे. कारण त्यात आपण आपलं प्रेम आणि आपलं पूर्ण व्य्नितमत्त्व सामावलेलं आहे.आपण जर पूर्ण रूपांतरित झालाे तरच मित्र आणि शत्रू यांना आपण समभावाने पाहू शकू.ही तीन मूळ सूत्रे आपण लक्षात ठेवली पाहिजेत.जेव्हा जेव्हा मनात असं येईल की, हा माणूस मित्र आहे, तेव्हा तेव्हा ‘का?’ असा प्रश्न विचारला पाहिजे. ‘अमुक माणूस शत्रू आहे’ असं मनात आलं की विचारलं पाहिजे, ‘का?’ याच्याकडून मला प्रेम मिळणार नाही म्हणून?, की हा माझ्या कामात अडथळा आणील म्हणून? कशासाठी हा माझा शत्रू आहे? आणि कशामुळे माझा मित्र आहे ?