या एका उत्कृष्ट ओवीत ज्ञानेश्वरमहाराज भगवंताचे आपल्या भक्तांवर कसे उत्कट प्रेम असते त्याचे उदाहरण देतात. आपल्या भक्तांना आपल्या प्रेमापाेटी दिवस व रात्र यांचे भान राहत नाही, हे सांगून झाल्यावर ज्ञानेश्वर म्हणतात की, आम्ही आमचे उत्कट प्रेम भक्ताला देण्याऐवजी भक्त ते आधीच प्राप्त करून स्थिरावलेले असतात.अर्जुना, स्वर्ग व माेक्ष यांच्या तुलनेने ज्या आडवाटा आहेत त्याही त्यांच्या ध्यानात येतात.आम्ही त्यांना द्यावयाचे प्रेम हीच त्यांची खरी कमाई आहे. खरे म्हणजे आम्ही द्यावयाच्या ऐवजी त्यांनीच ते आधी कमावले आहे. आम्ही दिले म्हणून भक्त त्याची प्रसिद्धी करतात. इतके झाल्यानंतर हे प्रेमसुखवाढावे, त्याला काळाची दृष्ट लागू नये, असे पाहणे आमचे कर्तव्यच आहे.
अर्जुना, पाहा की, आई ज्याप्रमाणे आपल्या बाळाच्या मागेमागे असते, त्याच्यावर प्रेमाचे पांघरूण घालते, त्याच्या मागे धावत असते, ते मूल जाे जाे खेळ करून दाखवेल किंवा मागेल ताे ताे खेळ ती माऊली त्याच्या पुढे साेन्याचा करून ठेवील.त्याचप्रमाणे मी माझ्या भक्तांचे प्रेम वाढवीत असताे. या प्रेमामुळे ते मला येऊन प्राप्त हाेतात.असे मी त्यांचे पालन करीत असताे. अरे अर्जुना, खरे पाहता आमच्या घरी प्रेमळ भक्तांचा दुष्काळ आहे. भक्तासाठी स्वर्ग व माेक्ष हे दाेन मार्ग आम्ही खुले केले. पण याहीपेक्षा प्रेमसुख हे ताजे टवटवीत व खात्रीचे असल्यामुळे आम्ही ते लक्ष्मीसह न देता आमच्या भक्तांसाठी जतन करून ठेवले आहे. प्रेमळ भक्तांच्या अशा कथा आम्ही ताेंडाने सांगाव्यात असे नाही.