मुंबई महापालिका प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये पूर्वी झालेल्या करारानुसार लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत संघटनांच्या प्रतिनिधींची समिती आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक झाली.या समितीमार्फत विविध संवर्गातील सफाई कामगारांची माहिती 20 डिसेंबरपर्यंत प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे.त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू हाेईल. सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू हाेण्याचा मार्ग माेकळा झाल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.पालिकेच्या मलनिः सारण, मुख्य मलनिःसारण, पर्जन्य जलवाहिन्या, बाजार, देवनार पशुवधगृह, रुग्णालये, स्मशानभूमी, कीटकनियंत्रण विभाग आणि इतर खात्यांतील सफाई कामगारांसाठी लाड पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, असा करार 28 जुलैस पालिका प्रशासनासाेबत करण्यात आला हाेता.
लाभार्थी कामगार निश्चित करण्यासाठी नियुक्त समितीत दि म्युनिसिपल युनियनचे उपाध्यक्ष रंगनाथ सातवसे यांचा समावेश करण्यात आला आहे.पालिकेच्या विविध खात्यांतील स्वच्छता कामगार, संवर्ग, कामाचे स्वरूप, कामासंबंधित पुरावे या अनुषंगाने कामगार संघटना 20 डिसेंबरपर्यंत प्रशासनाला सविस्तर माहिती सादर करणार आहे.संघटनांनी माहिती सादर केल्यानंतर प्रमुख कामगार अधिकारी संबंधित संवर्गाची एकूण पदे व इतर माहिती तयार करतील.तसेच उपप्रमुख लेखापाल आस्थापना 2 संबंधित संवर्गाच्या कामाचे स्वरूप पडताळून अहवाल सादर करणार आहेत.त्यांनतर विधी अधिकारी लाड पागे समितीच्या शिफारसी लागू करण्याच्या अनुषंगाने मत सादर करतील.