कुंभमेळ्यासाठी 717 काेटी रुपयांचा निधी वितरित

    10-Dec-2025
Total Views |
 
 
kumbh
 
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये 13 ऑक्टाेबर 2026 पासून सुरू हाेणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने जाेरदार तयारी सुरू केली आहे. सरकारने कुंभमेळ्याच्या आयाेजनासाठी 717 काेटींच्या निधीचा दुसरा हप्ता वितरित केला आहे. हा निधी कुंभमेळा आराखड्यातील विकास कामांवरच खर्च करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.नाशिकचा कुंभमेळा 24 जुलै 2028 पर्यंत सुरू राहणार आहे.यासाठी सरकारकडून विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. यासाठी 2025-26 या कालावधीत करण्यात येणाऱ्या कामांसाठी सरकारकडून 1000 काेटींची तरतूद करण्यात आली आहे.
 
कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण निर्माण करण्यात आले असून, या प्राधिकरणाला अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी 283 काेटींचा नधी 15 ऑक्टाेबरला वितरित करण्यात आला हाेता.उर्वरित 717 काेटींचा निधी वित्त विभागाच्या मान्यतेनंतर वित्तरित करण्याचा निर्णय नगर विकास विभागाकडून घेण्यात आला. याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.कुंभमेळ्यासाठी पहिल्या टप्प्यातीलकामाचा आराखडा राज्य सरकारकडून यापूर्वीच मंजूर करण्यात आला असून, त्याच कामावर हा निधी खर्च करावा, असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
 
या निधीचा वापर करताना यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना, निकष, तसेच अटींचे संपूर्ण पालन करण्याची जबाबदारी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष, तसेच नाशिकच्या विभागीय आयुक्तांची राहणार आहे. संबंधित कामांना सक्षम प्राधिकरणाची प्रशासकीय तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतरच निधी संबंधित यंत्रणांना वितरित करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.राज्य शासनाने रस्ते विकासासाठी 2270 काेटी 61 लाख रुपये आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामांसाठी 5140 काेटींचा निधी मंजूर केला आहे. त्यात नाशिक महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प, रस्ते, पूल, ओएफसी केबल, सीसी टीव्ही अग्निशमन आदी कामांसाठी 3016 काेटी 20 लाख रुपये, जलसंपदा विभागाच्या घाट बांधणे, बॅरेज, उपसा सिंचन याेजनेसाठी 750 काेटी 54 लाखांच्या कामांचा समावेश आहे.